बहिणाबार्इंच्या कवितेतील आखजी (आखाजी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:49 PM2019-05-07T17:49:51+5:302019-05-07T17:50:21+5:30
भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध भूमिका, वेशभूषा साकारलेल्या प्रा.कमल पाटील यांनी बहिणाबार्इंच्या कवितेतील आखाजी वर्णन केली आहे. वाचा ती त्यांच्याच शब्दात...
आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखाजी निंबावरी निंबावरी बांधलाय छान झोका जी ।
असं म्हणून आमच्या बहिणाई या मोलाच्या सणाचे मौलिकत्व अतिशय मार्मिक, चपखल आणि गोड शब्दात गुंफत जातात. खरंच आमचे सण, उत्सव मानवी जीवन सर्वार्थाने सुखी करणारे आहेत. फक्त आम्ही त्यामागची वैचारिक, तात्त्विक बैठक समजून घेणे आवश्यक आहे. संसार तापाने तापलेल्या, त्रासलेल्या जीवाला सुखाची, आनंदाची, चैतन्याची नवसंजीवनी देणारे हे सण आहेत. बरेच सण स्त्रियांना आगळ्या वेगळ्या सुखाची अनुभूती देणारे आहेत. आमचा आखजीचा सण सासुरवाशीणीला कशी सुखाची अनुभूती देतो याचे सुंदर वर्णन आमच्या बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या ‘आखजी’ कवितेत केले आहे. बहिणाबार्इंनी गुढीपाडवा, आखजी, पोळा या खान्देशातील कृषी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या सणांचे सुंदर चित्रण केले आहे.
खान्देशात साजरा होणारा ‘आखजी’ हा सण, या सणाचे त्या काळातील स्वरूप, महत्त्व कवयित्री बहिणाबाई चौधरी अतिशय रसाळ शब्दात सांगतात. बहिणाबार्इंच्या काळात १०, १२ वर्षाच्या मुलींचे विवाह होऊन त्या एकत्र कुटुंबात नांदायला जात. या एकत्र कुटुंबात काम आणि सासुरवास हेच या मुलींच्या वाट्याला यायचे. या त्रासात त्यांना माहेरची आस लागायची. या मुलींना सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळायचे ते सणाला माहेरपणासाठी गेल्यावर. त्यातही आखजीचा आनंद काय सांगावा -
माझा झोका माझा झोका
चालला भिरीभिरी जी ।
माझा झोका माझा झोका
खेयतो वाऱ्यावरी जी ।
असा झोका, गाणे यांचा अपूर्व आनंद त्या लुटतात. या झोक्याच्या वर्णनाच्या ओघात सासुरवाशीणीच्या मनाची आंदोलनेही आमच्या बहिणाई अगदी हळूवारपणे टिपतात.
गेला झोका गेला झोका
चालला माहेराले जी ।
आला झोेका आला झोका
पलट सासरले जी ।
असे स्त्री मनाचे हेलकावे त्या सहज टिपतात. ‘आखजीला’ झोक्याच्या आनंदाबरोबर अनेक गोष्टींचा आनंद त्या घेतात. त्यात गवराईचे खेळही महत्त्वाचे आहेत.
आमच्या खान्देशात आखजीची चाहुल चैत्राच्या सुरुवातीपासूनच लागते. लहान मुली चैत्र महिन्यात गवराई बसवतात. त्या सुंदर सजवतात म्हणूनच - गवराई गवराई
सजव सजवल्या जी
अशा सुंदर सजवलेल्या गवराईजवळ गाणे खेळ यासाठी ‘संगावीनी’ बोलवतात. गाण्यांबरोबर पिंगा, फुगडी, टिपºया अशा कितीतरी खेळांचा ‘धांगडधिंगा’ चालतो, एक वेगळा आनंदोत्सव या गवराईचे ‘आखजीला थाटात विसर्जन होते.
किती खेय, किती खेय,
सांगू मी काय काय जी
खेयीसनी खेयीसनी
आंबले हातपायजी
अशा खेळून थकलेल्या या मुली दोन दिवस विसावा घेतात आणि ‘सन सरे आस उरे’ असे म्हणून आता परत आखजी केव्हा येणार, असे ‘सईला’ विचारुन संसाराला लागतात, असे सुंदर वर्णन आखजीचे माझ्या बहिणाई करतात. लेवागण बोलीमुळे काव्य अधिकच रसाळ होते. याशिवाय या सणाला अनेक पैलू आहेत. पौराणिक महत्त्व या सणाचे आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण खरंच मोलाचा नाही का?
-प्रा.कमल पाटील, भुसावळ