बहिण संत मुक्ताबाईला बंधू ज्ञानोबारायांकडून साडीचोळी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 06:55 PM2018-07-26T18:55:38+5:302018-07-26T19:08:27+5:30
पंढरपूर येथील मुक्ताईच्या मठात गुरूवारी बहिण संत मुक्ताबाईला बंधू ज्ञानोबारायांकडून साडू चोळी भेट देण्यात आली. या सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.
आॅनलाईन लोकमत
मुक्ताईनगर, दि.२६ : संत मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून साडीचोळी भेटीचा सोहळा गुरूवारी पंढरपूर येथील मुक्ताबाई मठात पार पडला. आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. अजित कुळकर्णी यांच्या हस्ते साडी चोळी अर्पण करण्यात आली. या सोहळ्याला उपस्थित शेकडो भाविक आनंद व भक्तीचा हा सुखद क्षण डोळ्यात साठवितांना भावविभोर झाले होते.
आषाढी वारीत संत परंपरेनुसार दोघा भावंडाची भेट वाखरी (पंढरपूरजवळ) येथे होत असते. तथापि दिवसेंदिवस वाढत जाणारी सोहळ्यातील गर्दी लक्षात घेवून दोघा भावंडाची केवळ धावती भेट होत होती. त्यामुळे अलीकडे आषाढ शु. चतुर्दशीला पंढरपूर येथील मुक्ताबाई मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे बहीण मुक्ताबाईची महापूजा करून साडीचोळी अर्पण करण्यात येते. गुरूवारी प्रमुख विश्वस्त ह.भ.प.अजित कुळकर्णी यांनी मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक महापूजन करून साडीचोळी अर्पण केली.
ज्ञानोबादादाकडून बहीण मुक्ताबाईस साडीचोळी प्रदान केल्या जाण्याच्या भावपूर्ण सोहळ्याला उपस्थित भाविक हा सोहळा पाहून कृतकृत्य झाले. यावेळी मुक्ताबाई संस्थान कोथळी ता. मुक्ताईनगर येथील विश्वस्त पंजाबराव पाटील, शंकरराव संबारे पाटील, अजबराव पाटील, अशोकराव पवार, जयवंतराव महल्ले, राजू पाटील , पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, सुधाकर पाटील, उध्दव जुनारे, ज्ञानेश्वर हरणे, शशी पाटील, मुक्ताबाई फडावरील कीर्तनकार , टाळकरी महाराज मंडळी, वारकरी आणि भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.