अभ्यासाला बसतोय; पण, मनच लागेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:18 AM2021-03-10T04:18:13+5:302021-03-10T04:18:13+5:30
जळगाव : अभ्यासाला बसतोय; पण लक्षात राहत नाही. मनही लागत नाही. बेचैन होतेय, अशा समस्या सध्या किशोरवयीन मुला-मुलींमध्ये ...
जळगाव : अभ्यासाला बसतोय; पण लक्षात राहत नाही. मनही लागत नाही. बेचैन होतेय, अशा समस्या सध्या किशोरवयीन मुला-मुलींमध्ये असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर चिडचिड होणे, त्वचेबाबतही मुलांच्या समस्या सर्वाधिक आहेत. या सर्वांवावर राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत १० ते १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या समस्या जाणून घेत त्यांच्यावर उपचार केले जातात. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातात. या मुलांच्या सर्वाधिक तक्रारी या त्वचा व मानसिक आजारासंदर्भात आहेत. काही मुले तासन्तास अभ्यास करतात; परंतु त्यांच्या लक्षातच राहत नाही, तसेच काहींचे मन लागत नाही. काहींना झोप लागते तर काही पाठांतराने डोके जड पडत असल्याचे सांगतात. तसेच वाढत्या वयाबरोबर त्वचा, प्रजनन आरोग्य व शरीरातील बदलाच्याही समस्या मुले मांडतात. या सर्वांचे समुपदेशकांमार्फत समुपदेशन केले जाते. शिवाय वैद्यकीय तज्ज्ञ व आरोग्य विभागामार्फत उपचार केले जात असल्याचे सांगण्यात आले. जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबविला जातो. या कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक म्हणून पौर्णिमा पाटील ह्या काम पाहत आहेत.
३२ विषयांवर केले जाते समुपदेशन
जिल्ह्यातील ३० प्राथमिक आरोग्य केंद्रे, १७ ग्रामीण रुग्णालये, ३ उपजिल्हा रुग्णालये तसेच जिल्हा रुग्णालय येथे हा किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जात आहे. या ठिकाणी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, ३२ विषयांवर या समुपदेशकांकडून किशोरवयीन मुलांना समुपदेशन केले जाते.
शाळा, महाविद्यालयांत जाऊन मार्गदर्शन
राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत समुपदेशकांकडून शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. सुमारे हजाराच्या वर विद्यार्थ्यांचे आतापर्यंत विविध विषयांवर समुपदेश करण्यात आले आहे. चिडचिड होणे, अभ्यास लक्षात न राहणे, बेचैन वाटणे तसेच वाढत्या वयासह मासिक पाळीतील समस्या सर्वाधिक मांडल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
औषधांचे वाटप
ज्या किशोरवयीन मुला-मुलींना औषधांची आवश्यकता आहे त्यांना औषधांचे वाटप केले जाते. या कार्यक्रमांतर्गत मुलींना सॅनिटरी नॅपकिनसुद्धा दिले जाते. सध्या औषधांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा समन्वयक पौर्णिमा पाटील यांनी दिली.
प्राथमिक केंद्रे - ३०
ग्रामीण आरोग्य केंद्रे - १७
उपजिल्हा रुग्णालये - ०३
जिल्हा रुग्णालय - ०१