जीएमसीतील सीटू कक्ष पूर्ण रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:16 AM2021-05-24T04:16:04+5:302021-05-24T04:16:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सी-२ हा कक्ष रविवारी पूर्णत: रिकामा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सी-२ हा कक्ष रविवारी पूर्णत: रिकामा झाला आहे. या कक्षाची स्वच्छता करण्याचे काम सुरू असून लवकरच केमिकलने हा कक्ष धुण्यात येणार आहे. दरम्यान, म्युकरमायकोसिसच्या नॉनकोविड रुग्णांवर उपचारासाठी या हालचाली असल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप तसा निर्णय नसल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. जीएमसीच्या मुख्य इमारतीत २२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मार्च-एप्रिल महिन्यात सी-टू या कक्षात खुर्चांवर रुग्णांना वेटिंगवर ऑक्सिजन लावून बसविले जात होेते, असे गंभीर चित्र होते. या कक्षात ६४ बेडची व्यवस्था आहे. ऑक्सिजन पाइपलाइन असून, पॅनलद्वारे सिलिंडरमधून या कक्षाला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच सी-३ हा कक्षही रुग्ण नसल्याने बंद करण्यात आला होता. त्यातच आता रुग्ण कमी असल्याने सी-टू कक्षही बंद करण्यात आला आहे.
म्युकरचे सहा रुग्ण
म्युकरमायकोसिसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कक्ष-७ मध्ये ६ रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यासाठी पुरेसे इंजेक्शन व औषधी असून इंजेक्शन दिल्यानंतर लगेच चेहऱ्यावरची सूज उतरणे, दुखणे कमी होणे असे चांगले परिणाम रुग्णांवर दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आपल्याकडे रुग्णांची संख्या त्या मानाने कमी असून, रुग्णांचे लवकर निदान झाल्याने शस्त्रक्रियेपर्यंत तो जात नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या केवळ कोविडबाधितांवर म्युकरचे उपचार होत आहे.
आता केवळ टँकद्वारे ऑक्सिजन
लिक्विड ऑक्सिजन टँकमधून मुख्य इमारतीतील पाइपलाइनद्वारे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाता होता. सीटू व सीथ्री कक्षांना सिलिंडरद्वारे पुरवठा करावा लागत होता. आता या कक्षांमध्ये रुग्ण नसल्याने केवळ टँकद्वारेच ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत असून सिलिंडर वापर शून्यावर आला आहे.