गांभीर्य नसल्याने स्थिती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:58 AM2020-07-10T11:58:27+5:302020-07-10T11:58:36+5:30
देवेंद्र फडणवीस : कोरोना रुग्णसंख्या व मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची वाढत जाणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूदर पाहता ही स्थिती काळजी करण्यासारखी असून येथे मोठ्या प्रमाणात तपासण्या (टेस्टिंग) वाढवून उपाययोजनाही वाढविण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्यातील स्थिती पाहून व्यक्त केले. पुरेशा रुग्णवाहिकांची उपलब्धता नसणे, कोरोना रुग्णालयातील उपाययोजनांकडे दुर्लक्ष, टेस्टिंगचे कमी प्रमाण, अहवालाला विलंब अशा बाबींबाबत गांभीर्य नसल्याने येथील स्थिती चिंताजनक होत असल्याची टीकादेखील फडणवीस यांनी या वेळी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले.
मृत्यूवर नियंत्रण शक्य
जिल्ह्यात तपासणीचे प्रमाण कमी व त्यात तपासणी अहवालदेखील तीन-चार दिवस येत नाही. त्यामुळे स्वॅब घेतले तरी अहवाल येईपर्यंत लक्षणे वाढत जाऊन प्रकृती खालावत जाते व मृत्यू ओढावतो. त्यामुळे २४ तासात अहवाल येणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तीन-चार दिवस अहवाल येत नसेल तर हे गंभीर असल्याचे ते म्हणाले.
पाहिजे त्या प्रमाणात तपासणी नाही
-जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढण्यासह मृत्यूही मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथे तपासण्याही वाढविणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी या वेळी नमूद केले. येथील तपासण्या पाहता सध्या आयसीएमआरच्या निर्देशानुसार ज्या प्रमाणात टेस्टिंग व्हायला पाहिजे, त्याच्या तुलनेत कमी टेस्टिंग होत असल्याचे फडणवीस यांनी सांगत या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यात टेस्टिंग वाढविण्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या असल्याचे फडणवीस म्हणाले.
नातेवाईकांचा वावरही धक्कादायक
- कोरोना रुग्णालयात दाखल रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांचाही वावर धक्कादायक प्रकार असल्याचे फडणवीस म्हणाले. रुग्णांजवळ नातेवाईक गेल्यास संसर्ग वाढण्याची भीती असताना असे प्रकार घडणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. यासाठी आता ‘बेड असिस्टंट’ नियुक्त केले असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले, असे फडणवीस म्हणाले. काही दिवसांपूर्वी येथे डॉक्टर मिळाले, तरीदेखील ही संख्या कमी असून डॉक्टर नियुक्ती बाबत गांभीर्याने विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वपक्षाबाबत बोलणे टाळले
कोरोनाच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर टीका करीत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात ज्या शहरांमधील महापालिका, नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे, तेथेच कोरोनाचा विस्फोट होऊन तेथे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली असल्याच्या मुद्यावर फडणवीस म्हणाले, कोरोना हा जगाचा प्रश्न असून त्यासाठी पक्ष पाहून आपण राजकारण करीत नाही, असे सांगत स्वपक्षाची सत्ता असलेल्या शहरांबद्दल बोलणे टाळले.
‘नॉन कोविड’ रुग्णांची समस्या मोठी... जळगाव जिल्ह्यात कोविड रुग्णांपेक्षा कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांची (नॉन कोविड) समस्या मोठी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. शासकीय रुग्णालय पूर्णपणे कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्याने नॉन कोविड रुग्णांचे हाल होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. नॉन कोविड रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले जात असल्याच्याही तक्रारी आल्या असल्याचे फडणवीस म्हणाले.