सायगावचे ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत विठ्ठल बच्छे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 05:03 PM2018-10-01T17:03:04+5:302018-10-01T17:05:40+5:30
गिरणा परिसरातील प्रसिद्ध तमाशा कलावंत विठ्ठल लक्ष्मण बच्छे (८६) यांचे शुक्रवारी निधन झाले. भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले.
सायगाव ता. चाळीसगाव - येथील रहिवाशी व गिरणा परिसरातील प्रसिद्ध तमाशा कलावंत विठ्ठल लक्ष्मण बच्छे (८६) यांचे शुक्रवारी निधन झाले. भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे आहेत. ते विजय बच्छे यांचे वडिल होत.
बच्छे परिवारात दशरथ बच्छे व विठ्ठल बच्छे हे सहा भाऊ. यात या दोन भावंडाना तमाशा पाहण्याची आवड. या आवडीतून त्यांना धोंडू कोंडू यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळात काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचे दोन्ही भावांनी सोने केले. नावलौकिक मिळविला. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ४५ वर्षापूर्वी शिंदी - कोळगांव येथील नावाजलेल्या धोंडू- कोंडू या तमाशातून केली. यामध्ये कोंडू रामजी राजाचे तर विठ्ठल बच्छे हे राणीचे पात्र करीत असत. त्यामुळे विठ्ठल बच्छे हे प्रसिध्दीच्या झोतात आले. पुढे दशरथ बच्छे देखील तमाशा मंडळात आले. या दोन्ही भावडांचा अभिनय पाहण्यासाठी खूप गर्दी जमायची.
पुढे या भावडांचा अभिनय बहरत गेला आणि खान्देशी नावाजलेले लोकनाट्य भिका भिमा सांगवीकर या लोकनाटयामध्ये दोघांनी प्रवेश केला आणि सलग ४२ वर्ष यामध्ये काम केले. कालांतराने वय वाढले त्यामुळे पुढे दोन्ही जण थकले. दशरथ बच्छे (८२) यांचे ५ एप्रिल २०१६ रोजी निधन झाले. आणि विठ्ठल बच्छे यांचे वयाच्या ८६ वर्षी नुकतेच निधन झाले. या दोन्ही भावांची परिस्थिती जेमतेम आहे. त्यांनी तमाशा कलावंत म्हणून एवढे नांव कमावले की, त्यांना गरीबी जाणवलीच नाही. विठ्ठल यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.