जळगाव जिल्ह्यातील वनजमिनींच्या परस्पर विक्री प्रकरणात ६ आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:17 PM2018-12-09T12:17:09+5:302018-12-09T12:18:34+5:30
‘लोकमत’ने आणले होते प्रकरण उघडकीस
जळगाव : कंडारी व भागपूर शिवारातील वनजमिनीचा बनावट सातबारा तयार करून परस्पर विक्री केल्याप्रकरणात शनिवारी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दोन व शहर पोलीस स्टेशनला एक असे तीन गुन्हे दाखल झाले. त्यात ११ जणांना आरोपी करण्यात आले असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील भागपूर व कंडारी शिवारात २२८८ एकर जमिनची वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने ८ आॅक्टोबर रोजी उघडकीस आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरु झाली व आज गुन्हे दाखल झाले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
तलाठी व वकीलही आरोपी
या प्रकरणात मुकुंद बलविरसिंंह ठाकूर (रा.बळीराम पेठ, जळगाव), सुरेंद्र बलविरसिंह ठाकूर (रा.बळीराम पेठ, जळगाव), कंडारी तलाठी रवींद्र पंढरीनाथ बहादुरे (रा.आॅडीटर कॉलनी, जळगाव), अॅड. प्रदीप निवृत्तीनाथ कुळकर्णी (रा.दादावाडी, जळगाव), रुपेश भिकमचंद तिवारी (रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव), सतीश प्रल्हाद सपकाळे, कैलास दशरथ बारी, राजेंद्र बुधोजी बारी, सुभाष दशरथ बारी, गणेश व्ही.बारी, सुनील दशरथ बारी (सर्व रा.नवी पेठ, जळगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला आहे. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अभिमन्यू अर्जून पाटील (वय५६,रा.आनंद कॉलनी, जळगाव) व नेहा कांतीलाल शर्मा (वय २८, रा.एरंडोल) व शहर पोलीस स्टेशनला भाजपाचेमाजीनगरसेवकसुनील दत्तात्रय माळी (वय ५४, रा.शनी पेठ, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
यांना झाली अटक
गणेश विठ्ठल बारी, राजेंद्र बुधो बारी, कैलास दशरथ बारी, सुनील दशरथ बारी, सुभाष दशरथ बारी व रुपेश भिकमचंद तिवारी यांना सायंकाळी अटक करण्यात आली.या सर्वांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्णात अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयित बनावट खरेदीखत तयार करुन देणारे आहेत.
काय आहे प्रकरण?
जळगाव तालुक्यातील भागपूर व कंडारी शिवारात २२८८ एकर जमिनची वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री झालीआहे. कोट्यवधीच्या या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने जिल्हा निबंधक कार्यालयाकडून खरेदीखतांच्या प्रती मागविल्या होत्या. त्याआधारे या प्रकरणात सुमारे ८०० एकरच्या आसपास जमिनीची बनावट सातबाराच्या आधारे जमिनी विक्री झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मुळ खरेदीदारांनीच शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेत फिर्याद दिली. त्यानुसार वेगवेगळ्या पोलिसात हे गुन्हे दाखल झाले. या जमिनींचा व्यवहार हा ९ कोटी ७ लाख १० हजार रुपयात झालेला असून संशयितांना ही रक्कमही मिळालेली आहे.