जळगावातील उद्योजकाच्या खून प्रकरणात आफ्रिकेत सहा जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:16 AM2021-03-31T04:16:39+5:302021-03-31T04:16:39+5:30
जळगाव : पाळधी, ता. धरणगाव येथील मूळ रहिवासी व आफ्रिकेतील जार्डीन मेबल या कंपनीचे मालक सर्वेश श्रीकांत मणियार (४२) ...
जळगाव : पाळधी, ता. धरणगाव येथील मूळ रहिवासी व आफ्रिकेतील जार्डीन मेबल या कंपनीचे मालक सर्वेश श्रीकांत मणियार (४२) यांच्या खून प्रकरणात स्थानिक पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, त्यात त्यांचा चालक व सुरक्षा रक्षकाचाही समावेश आहे. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सर्वेश यांचे वडील श्रीकांत मणियार यांनी ‘लोकमत’ला दिली.
आफ्रिका खंडातील मडागास्कर देशात मणियार यांच्या जार्डीन मेबल या नावाने तीन कंपन्या आहेत. जानेवारी महिन्यात त्यांचा घराच्याच बाथरूममध्ये खून झाला होता. व्यावसायिक स्पर्धेतून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
वडील व भावाचा जबाब
या घटनेत मारेकऱ्यांना अटक झाल्यानंतर वडील श्रीकांत मणियार हे आफ्रिकेत गेले होते, तर त्यांचे दुसरे पुत्र शैलेश तेथेच होते. हे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविले जात असून, त्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. न्या.ॲण्ड्रीएमपेनेनासोलो यांच्या न्यायालयात पिता- पुत्राचा तब्बल चार तास जबाब नोंदविण्यात आला. भारताचे राजदूत अभयकुमार, तसेच सेक्रेटरी मनी अग्रवाल यांनी मणियार परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी स्थानिक सरकार व पोलीस यंत्रणेकडे पाठपुरावा केला. मणियार पिता- पुत्र २० दिवसांपासून आफ्रिकेत होते. मंगळवारी ते पाळधीत परतले. दरम्यान, या गुन्ह्यात आणखी चौघांना अटक करणे बाकी असल्याचे मणियार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.