अमळनेरात आॅनलाइन जुगार खेळताना सहा जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 03:53 PM2019-12-10T15:53:24+5:302019-12-10T15:55:27+5:30
उच्चभ्रू वस्तीत आॅनलाइन राजश्री राशीफल नावाचा जुगार खेळताना अमळनेर पोलिसांनी छापा टाकला.
अमळनेर, जि.जळगाव : उच्चभ्रू वस्तीत आॅनलाइन राजश्री राशीफल नावाचा जुगार खेळताना अमळनेर पोलिसांनी छापा टाकला. त्यात चार लाख १३ हजार रुपये रोख, १६ मोबाइल, ३५ एटीएम कार्ड, लॅपटॉप, एक कार, दोन मोटारसायकली असे एकूण २८ लाख १८ हजार ७६० रुपयांचे साहित्य जप्त करून महेंद्र महाजन या मुख्य संशयित आरोपीसह सहा जणांना अटक करण्यात आली. ही घटना ९ रोजी रात्री उशिरा भगवा चौकातील पाटील कॉलनीत हिराई पार्कमध्ये घडली
डीवाय.एस.पी. राजेंद्र ससाणे व पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांना शहरात भगवा चौकात मोठ्या प्रमाणात आॅनलाइन जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाली. ते स्वत: व पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, पोलीस नाईक शरद पाटील, दीपक माळी, भटूसिंग तोमर, रेखा ईशी, किशोर पाटील, हितेश चिंचोरे, रवी पाटील, सुनील पाटील यांच्या पथकाने भगवा चौकातील पाटील कॉलनीत हिराई पार्कमध्ये पहिल्या माळावर महेंद्र सुदाम महाजन यांच्या राहत्या घरी छापा टाकला. त्यात महेंद्र सुदाम महाजन, अमोल ज्ञानेश्वर बडगुजर (वय २४, रा.आम्लेश्वर नगर), फिरोज नसिमखान पठाण (वय ३३, रा.अंदरपुरा, सराफ बाजार), नकुल राजधार माळी (वय ४४, रा.झामी चौक), जयंत गणेश पाटील (वय ३१, रा.पवन चौक), पुंडलिक ईश्वर चौधरी हे मोबाइलवर आॅनलाइन राजश्री राशीफल नावाचा जुगार चालवताना आढळून आले. त्यांच्याजवळील ५२ हजार रुपयांचे १६ मोबाइल, २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, चार लाख ३१ हजार रुपये रोख, पाच हजार रुपयांचे नोटा मोजण्याचे मशीन, २० लाख रुपयांची किमती कार, ३० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली, २६ डायºया, कॅलक्युलेटर, जुगाराचे साहित्य असे एकूण २८ लाख १८ हजार ७६० रुपयांचा माल आढळून आला. पोलिसांनी सर्व माल जप्त करून सहा आरोपीना अटक करून १० रोजी पहाटे रवींद्र पाटील यांंनी फिर्याद दिली. त्यावरून महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.