पिंपळगाव बु.च्या युवकाकडून चोरीच्या सहा दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:42 PM2019-02-28T22:42:33+5:302019-02-28T22:42:45+5:30
युवकाला अटक
: तीन लाखांच्या दुचाकी
पहूर, ता. जामनेर - पिंपळगाव बु. ता. जामनेर येथील अठरा वर्षीय युवकाच्या ताब्यातून तीन लाख दहा हजार किंमतीच्या चोरीच्या सहा दुचाकी पहूर पोलिसांनी हस्तगत करून संबंधित युवकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकोद येथील रहिवासी शे.शोहेब शे.तस्लीम यांची एम एच २०, बीवाय ६८२७ क्रमांकाची दुचाकी १२फेब्रुवारी रोजी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पहूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे पोलीस चोरट्याच्या शोधात होते. पिंपळगाव बु. येथील रहिवासी पारदर्शी उल्हास पाटील (१८) या युवकाविषयी गुप्त माहिती मिळाली व त्याच्या हालचाली पोलिसांना संशयित वाटल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकीचा वापर हा युवक करीत होता. त्यानुसार पो.काँ.प्रवीण देशमुख, शशिकांत पाटील, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, किरण शिंपी, अरूण वाणी, ज्ञानेश्वर बाविस्कर, रवींद्र भोई, श्रीराम कुमावत, पोलीस मित्र पिंटू कुमावत या पथकाने गुरुवारी पारदर्शी पाटीलला शिताफीने ताब्यात घेतले. त्याने कमानी धरणाजवळ चोरीच्या लपवून ठेवलेल्या सहा दुचाकींची पोलिसांना कबुली दिली. यातील पाच दुचाकी विना क्रमांकाच्या असून वाकोद येथील दुचाकीवरच क्रमांक आहे. या दुचाकी घटनास्थळारून पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केल्या आहेत. जवळपास तीन लाख दहा हजार किंमतीच्या दुचाकी असून चार दुचाकी बºहाणपूर येथील आहेत तर एक दुचाकी भुसावळ व एक वाकोद येथून चोरून आणल्याची माहिती पोलिसांना या युवकाने दिली. पहूर पोलिसांनी युवकाला अटक केली आहे.