फैजपूरला सहा नगरसेवकांचे उपोषण सुरू
By admin | Published: March 12, 2016 01:02 AM2016-03-12T01:02:45+5:302016-03-12T01:02:45+5:30
पालिकेने यात्रा कर लावावा त्यासाठी जाहीर निविदा काढावी, शहर तथा परिसरातील विटभट्टय़ांवर प्रदूषण कर आकारावा यासाठी नगरसेवकांनी उपोषण सुरू केले.
फैजपूर : प्रसिद्ध खंडोबा यात्रा 22 पासून सुरू होत आहे. पालिकेने यात्रा कर लावावा त्यासाठी जाहीर निविदा काढावी, शहर तथा परिसरातील विटभट्टय़ांवर प्रदूषण कर आकारावा यासाठी माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांच्यासह सहा नगरसेवकांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासून पालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपोषणाला सुरुवात झाली. राणे यांनी यात्राकर लागू करावा, अशी मागणी केली होती. त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपोषण सुरू झाले. राणे यांच्यासह नगरसेवक शे.कुर्बान शे.करीम, शाहीन परवीन शे.रियाज, अनिता अरुण चौधरी, पल्लवी जयदीप राणे, शकील खान बशारत खान बसले आहे. उपोषणाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, पीआरपी, आरपीआय आठवले गट, बजरंग ग्रुप, साई ग्रुप यांचा पाठिंबा मिळाल्याचे उपोषण स्थळावरून सांगण्यात आले. अनेकांनी उपोषणकत्र्यांच्या भेटी घेतल्या. मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांनी उपोषणकत्र्याची सकाळी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली व मागण्यांचा विचार करू असे सांगितले असता ठोस आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले. सायंकाळी पुन्हा ओगले-शिंदे यांनी भेट घेऊन नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे लेखी दिले त्यावरही समाधान न झाल्याने उपोषण सुरूच राहिले. राष्ट्रवादीचे रावेर तालुकाध्यक्ष सोपान पाटील, पप्पू चौधरी, संदीप भारंबे, शे. रियाज, राजू काठोके, शिवा कोळी, दिनेश सोनवणे, शे.नासीर, शे.साबीर, शे.आरीफ, गोपी साळी, अन्वर खाटीक यांची उपस्थिती होती. (वार्ताहर)