साडेसहा हजारावर करदात्या शेतकऱ्यांनी भरले सहा कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:21 AM2020-12-30T04:21:38+5:302020-12-30T04:21:38+5:30
जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी सहा हजार ६४७ जणांनी पाच ...
जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ घेतलेल्या १३ हजारावर आयकर दाते शेतकऱ्यांपैकी सहा हजार ६४७ जणांनी पाच कोटी ९३ लाख २१ हजार ४०० रुपयांची रक्कम परत केली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभ देण्यात आलेले १३ हजार १७२ शेतकरी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे ते लाभार्थी या योजनेंतर्गत पुढील हप्ता मिळण्यास अपात्र ठरले व त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांवरील लाभाची रक्कम वसूल करून केंद्र शासनाला परत करण्यात येणार आहे. यासाठी या शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.
या योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती शासनाला पाठवताना सरसकट शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात आला. जिल्ह्यात या योजनेंतर्गत ४ लाख ९७ हजारावर लाभार्थी शेतकरी दरवर्षी ६ हजार रुपयांचा किसान सन्मान निधी मिळण्यास पात्र आहेत. शासनाने किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी आयकर विभागाकडे पाठविली होती. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थी हे आयकर दाते असल्याचे आढळून आले होते. त्या लाभार्थ्यांची यादी शासनाने जिल्हा प्रशासनाला पाठविली होती.
प्रत्येक तहसील कार्यालयामार्फत वसुली
आयकरदात्या लाभार्थ्यांकडून किसान सन्मान निधीचे हप्त्याची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्ह्यातील १३ हजार १७२ लाभार्थ्यांकडून १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांचा सन्मान निधी वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयाचे स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. ती रक्कम योजनेच्या जिल्हास्तरीय खात्यात जमा करून राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठवण्यात येणार आहे.
त्यानुसार आता आयकरदात्या शेतकऱ्यांनी रक्कम भरण्यास सुरुवात केली असून, यामध्ये आतापर्यंत सहा हजार ६४७ करदात्या शेतकऱ्यांनी पाच कोटी ९३ लाख २१ हजार ४०० रुपयांची रक्कम जमा केली आहे.
तालुकानिहाय शेतकरी व भरलेली रक्कम
तालुका रक्कम भरलेले शेतकरी भरलेली रक्कम
जळगाव ५९९ ६७, ६६,०००
जामनेर ५९९ ५४,९४,०००
एरंडोल २४८ २३,१६,०००
धरणगाव ४४६ ३८,६८,०००
पारोळा ३५० ३१,६६०००
भुसावळ ५३५ २९,६४०००
बोदवड १६८ १५,४२०००
मुक्ताईनगर १७४ १७,०४०००
यावल ५४७ ३७,७८०००
रावेर ९४१ ६९,५८४००
अमळनेर ६२१ ५७,७६०००
चोपडा ३६९ ३३,८६०००
पाचोरा ५०९ ४०,१५०००
भडगाव २८९ ३०,३६०००
चाळीसगाव ४८४ ४५,५२०००
एकूण ६६४७ ५,९३,२१४००