घरफोडी करणारी भुसावळ येथील सहा जणांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 10:26 PM2017-12-12T22:26:03+5:302017-12-12T22:27:47+5:30
जिल्ह्यातील मोठ्या शहरात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून ४० हजार ५०० रुपये रोख, दोन कॅमेरे, सोने-चांदीचे दागिने व दुचाकी असा ८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने एकट्या भुसावळ शहरात आॅक्टोबर महिन्यात चार घरफोड्या केल्या आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : जिल्ह्यातील मोठ्या शहरात घरफोडी करणारी सहा जणांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून ४० हजार ५०० रुपये रोख, दोन कॅमेरे, सोने-चांदीचे दागिने व दुचाकी असा ८४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीने एकट्या भुसावळ शहरात आॅक्टोबर महिन्यात चार घरफोड्या केल्या आहेत.
अटक केलेल्यांमध्ये आकाश भानदास गोरखा (वय १९), अभिषेक प्रदीप भालेराव (वय १९) दोन्ही रा.रेल्वे क्वार्टर, भुसावळ, आकाश उर्फ टेके शाब्बास रामटेके (वय २०, रा.लिटी, जि.चंद्रपुर, ह.मु.भुसावळ), आकाश रमेश परदेशी (वय २१, रा. कवाळे नगर, भुसावळ), भूषण नाना राठोड (वय २२ रा.रेल्वे कॉलनी, भुसावळ) व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
रेल्वे वैद्यकिय अधिका-याकडे केली घरफोडी
रेल्वेचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सिध्दीश ईश्वरचंद जायस्वाल (वय ४७, रा.रेल्वे आॅफिसर कॉलनी, भुसावळ) यांच्याकडे १७ ते २१ आॅक्टोबर या कालावधीत घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा व आतील दरवाजाचे पॅनल काढून १८ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाला होता. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. घरफोडीचे दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना स्वतंत्र पथक तैनात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भुसावळातील गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या टोळीचा सुगावा लागला.
एकाला पकडल्यानंतर पाच जण समोर
या गुन्ह्याचा तपास करीत असताना आकाश गोरखा हा पथकाच्या हाती लागला. त्याची चौकशी केली असता अभिषेक भालेरावचे नाव पुढे आला. या दोघांकडून चोरीच्या इलेक्ट्रनिक्स वस्तू हस्तगत केल्यानंतर त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला. पोलीस चौकशीत घरफोडी करणारी सहा जणांची टोळी असून आकाश रामटेके हा मुख्य सूत्रधार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने रामटेके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आणखी तीन जणांची नावे पुढे आली. त्यानुसार आकाश परदेशी, भूषण राठोड व एका अल्पवयीन मुलाला पकडण्यात आले. या सहा जणांना एकत्र आणल्यावर त्यांनी भुसावळ शहरात चार ठिकाणी घरफोडी व एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.