जामनेरातील वादग्रस्त संकुलाबाबत सहा तास झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:30+5:302021-04-16T04:15:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेले व्यापारी संकूल हे शासन नियमानुसार नसल्याची तक्रारी ...

Six hours of squabbling over the disputed complex in Jamnera | जामनेरातील वादग्रस्त संकुलाबाबत सहा तास झाडाझडती

जामनेरातील वादग्रस्त संकुलाबाबत सहा तास झाडाझडती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेले व्यापारी संकूल हे शासन नियमानुसार नसल्याची तक्रारी ॲड.विजय पाटील यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समिती जिल्हा परिषेदत दाखल झाली असून या समितीने गुरूवारी दुपारी १ ते पावणे सात वाजेपर्यंत संकुलाच्या कागदपत्रांची छाननी केली. ही प्राथमिक स्तरावरील चौकशी असल्याचे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मनिष सांगळे यांनी सांगितले.

समितीत मनिष सांगळे यांच्यासह सहाय्यक आयुक्त राजन पाटील, लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के.बी.रणदिवे, बांधकाम विभागाचे अधिकारी नंदू पवार आदींसह कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जि.पच्या तक्रार निवारण कक्षाच्या पाठीमागे असलेल्या कोविड समुपदेशन कक्षाच्या शेजारी असलेल्या सभागृहात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संकुलाबाबतच्या सर्व फाईली व कागदपत्रे आणली होती. यासह या संकुलाबाबत झालेले ठराव, सर्व फाईल्स यांची बारकाईने अधिकारी तपासणी करीत होते. दरम्यान, गुरूवारी वेळ कमी असल्याने शुक्रवारी पुन्हा उर्वरीत कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

जामनेरात अद्याप भेट नाही

हे संकुल म्हणजे कदाचित हा राज्यातील पहिलाच प्रकल्प होता. त्याची कागदपत्रे अधिक असून प्राथमिक स्तरावर कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे संबधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जामनेरात सद्या भेट दिली नाही. कागदपत्र तपासणीलाच अधिक कालावधी लागणार आहे. पुढील आठवड्यात पुन्हा नियोजन करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

जामनेरात जि.प.च्या जागेवर मराठी, उर्दू शाळा व पंचायत समिती कार्यालय इमारती बांधकाम करण्यासह उर्वरित जागेवर वाणिज्य प्रयोजनासाठी संकुल बांधकामासाठी शासनाने २०११ साली मान्यता दिली होती. भूमिपूजनाआधी प्रिमियमची रक्कम अदा करणे बंधनकारक केले होते. मात्र, ठेकेदार आर. के. शर्मा त्यांचे भागीदार श्रीकांत खटोड तसेच श्रीराम खटोड यांनी ती रक्कम भरली नाही. ६ कोटी ९८ लाख ३५ हजार ही रक्कम अद्यापही जि. प. ला अदा केलेली नसल्याची तक्रार ॲड. विजय पाटील यांनी ३० मार्च २०२१ रोजी केली होती. त्यानुसार या तक्रारीची चौकशी करण्यासाठी ६ एप्रिल रोजी समिती स्थापन केली होती. उर्दू शाळा ही बोदवड रस्त्यावर दोन ते तीन किलोमिटर अंतरावर बांधण्यात आली तसेच संकुलाचा तिसरा मजला बेकायदेशीर असल्याबाबत ॲड.पाटील यांनी तक्रारी केली हेाती. यानुसार ६ एप्रिल रोजी ग्रामविकास विभागाने तातडीने त्री सदस्यीय समिती नियुक्त करीत या संकुलाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार ही समिती जिल्हा परिषदेत दाखल झाली आहे.

राष्ट्रवादीचे निवेदन

या संकुलाच्या बदलाबाबत कुठलीही परवनागी न घेता विकासकाने बांधकाम केले असून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून दुकाने दिली आहेत. यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य रवींद्र पाटील यांनी केला आहे. त्यांनी याबाबत समितीचे अध्यक्ष मनिष सांगळे यांना निवेदन दिले आहे. यात पारदर्शकपणे चौकशीकरून संबधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष धवल पाटील, महानगर उपाध्यक्ष अमोल कोल्हे उपस्थित होते.

Web Title: Six hours of squabbling over the disputed complex in Jamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.