वावडे लोकनियुक्त सरपंचासह सहा सदस्य पुन्हा अपात्र; ग्रामसेवकविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या चौकशीत सदस्यच आढळले दोषी
By संजय पाटील | Published: September 9, 2022 03:44 PM2022-09-09T15:44:11+5:302022-09-09T16:01:16+5:30
जळगावातील वावडे लोकनियुक्त सरपंचासह सहा सदस्य पुन्हा अपात्र ठरले आहेत.
जळगाव (अमळनेर) : मुदतीत कर भरणा न केल्याने तालुक्यातील वावडे येथील लोकनियुक्त सरपंचासह पाच सदस्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. ग्रामसेवकविरुद्ध केलेली तक्रार ग्रामपंचायत सदस्यांच्या अंगलट आली आहे. लोकनियुक्त सरपंच राजेंद्र मगन भिल, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पंढरीनाथ पाटील, अनिता अशोक भिल, उज्वला चंद्रकांत पाटील, कैलास चुडामण पाटील, सोनाली सुभाष पाटील अशी या अपात्र करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत.
वावडे येथील ग्रामपंचायतीच्या वरील सदस्यांनी तत्कालीन ग्रामसेवक राजेंद्र सोनवणे यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांच्या (सी एम) पोर्टलला ऑनलाईन तक्रार केली होती. त्या तक्रारीची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या पथकाने चौकशी केली होती. त्यात ग्रामसेवकाचे दोष तर आढळले नाहीत उलटपक्षी लोकनियुक्त सरपंचासह या सहाही जणांनी कर वसुलीबाबत नोटीस मिळल्यानंतरही तीन महिन्यात कर भरला नसल्याचे आढळून आले. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केले होते. त्यावर या सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व अमळनेरचे गटविकास अधिकारी यांच्याविरुद्ध नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. अपिलावर आयुक्तांनी जिल्हाधिकारींनी पुन्हा चौकशी करून निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पुन्हा चौकशी करून दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. या सहा सदस्यांनी कर भरला नसल्याचे आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी ८ रोजी आदेश काढत लोकनियुक्त सरपंचासह सहा सदस्यांना पुन्हा अपात्र ठरवले आहे.