महापालिकेच्या दहापैकी सहा डॉक्टरांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:46+5:302021-02-10T04:16:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात दुसरा टप्पा सुरू झाला. मात्र, कर्मचाऱ्यांचा हवा तास प्रतिसाद या लसीकरणाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात दुसरा टप्पा सुरू झाला. मात्र, कर्मचाऱ्यांचा हवा तास प्रतिसाद या लसीकरणाला मिळत नसून, दिवसाला केवळ ४० ते ५० टक्केच उद्दिष्ट साध्य होत आहे. यातही आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी आहे, अन्य कर्मचाऱ्यांचाच लस घेण्याकडे अधिक कल असल्याचे चित्र आहे. महापालिकेतील दहापैकी सहाच डॉक्टरांनी लस घेतली आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सात केंद्रांवर सुरुवात झाली. अधिकचे डोस प्राप्त झाल्यानंतर तेरा केंद्र करण्यात आले. मात्र, सुरुवातीचे काही दिवस अगदीच कमी प्रतिसाद होता. शासकीय कर्मचारी पुढे येत नसल्याने महापालिकेने अखेर खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले होते. हळूहळू शहराची संख्या वाढली. दरम्यान, महापालिकेचे केंद्र अडचणीच्या ठिकाणी असल्याने, शहरात दोन खासगी रुग्णालयांमध्ये ही केंद्र सुरू करण्यात आली. मात्र, तरीही शासकीय कर्मचारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. त्यात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतलेली नाही. दरम्यान, यातील दोन डॉक्टर आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्याचे लसीकरणाचे लक्ष्य
२००,०००
प्रत्यक्ष लसीकरण
११,०४०
लसीकरणाला ठेंगा
८ हजार ७०
कोरोना लसीकरण टाळण्यासाठीची यादी मोठी
१ सद्या ही ट्रायल सुरू आहे. लसीकरणानंतर नेमक्या काय रिॲक्शन येत आहेत, याची पूर्ण चाचपणी झाल्यानंतर विचार करू. लस घेण्याबाबत आताच घाई नको, शिवाय कामाच्या व्यापात वेळ देता येत नाही.
२ मी आजपर्यंत इंजेक्शन घेतलेले नाही, गेल्या दहा महिन्यांत साधी सर्दीही झाली नाही. कोरोना होऊन गेला असेल. त्यामुळे लस घेणे एवढे अत्यावश्यक वाटत नाही, शिवाय काही रिॲक्शन आल्यास कामाकडे दुर्लक्ष होईल.
३ लसीकरणाने शरीरात अँटिबॉडीज विकसित होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्या किती कालावधी टिकतील शिवाय लस घेतल्यानंतर पाळायची पथ्ये, नेमके याचे परिणाम काय, या बाबी अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे बघू नंतर, अशी अनेक कारणे लसीकरण टाळण्यासाठी दिली जातात. लस ही ऐच्छिक असून, ती बंधनकारक नाही, असेही सांगितले जाते.
शहराचे
लक्ष्य ३,५०० हजार
प्रत्यक्ष दिले किती २,१६०
डॉक्टर
लक्ष्य : १०
प्रत्यक्ष : ०६
परिचारिका
लक्ष्य ७२
प्रत्यक्ष किती : ५०पेक्षा अधिक
१८ केंद्र
लक्ष्य किती आहे : ३,६००
प्रत्यक्ष किती होते : ८०० सरासरी
पहिल्या दिवशी अधिकारी
लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी पहिल्याच दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी. जमादार आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी लस घेतली होती. मात्र, तरीही डॉक्टरांचे प्रमाण हवे तसे वाढले नाही, अन्य कर्मचाऱ्यांचे प्रमाण मात्र, यात अधिक राहिल्याची माहिती आहे.