जळगाव येथे एकाच रुग्णालयात डेंग्यूचे सहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:45 AM2018-09-28T11:45:23+5:302018-09-28T11:46:06+5:30
शहरवासीयांमध्ये भीती
जळगाव : शहरात डेंग्यूचा कहर दिवसेंदिवस वाढत असून खोटेनगरातील धनश्री नगरमधील १५ वर्षीय मुलाला डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलासोबतच एकाच रुग्णालयात सहा डेंग्यूचे रुग्ण असून इतर भागातही डेंग्यू सदृष्य आजाराच्या लक्षणाने नागरिक भयभीत झाले आहे.
वातावरणात बदल होऊन अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याच्या तक्रारी वाढून अनेकांना पोटदुखी व जुलाबचा त्रास वाढला. त्यानंतर गेल्या दीड महिन्यांपासून डेंग्यूने कहर केला आहे. दीड महिन्यात शहरातील हजारो घरांमध्ये डेंग्यूच्या अळ््या आढळून आल्या होता व याच दरमयान शिवाजीनगरातील एका बालिकेचा डेंग्यूने बळी घेतला होता.
आता पुन्हा दररोज दोन ते तीन रुग्ण डेंग्यूचे येत असल्याची माहिती मिळाली. यामध्ये धनश्री नगरातील पराग शालीग्राम पाटील (१५) या मुलालाही डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर मुलास तीन ते चार दिवसांपासून थंडी-तापचा त्रास होत होता. त्याला रुग्णालयात दाखविले असता डॉक्टरांनी रक्त तपासणी करण्यास सांगितले. या तपासणीत डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. या मुळे मुलाचे कुटुंब भयभीत होण्यासह परिसरातही भीतीचे वातावरण पसरले आहे. या सोबतच एकाच खाजगी रुग्णालयात सहा डेंग्यूचे रुग्ण दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यास डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे.
शहरातील मेहरुण परिसर, वाघ नगर, रुख्मीनी नगर, समता नगर या भागातदेखील डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षणे असल्याचे या परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या भागात ताप येणे, डोके दुखणे, मळमळणे अशी लक्षणे असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. हे नागरिक खाजगी रुग्णालयात धाव घेत असून उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, स्वाईन फ्लूने दोन बळी घेतल्यानंतर शहरात डेंग्यूचाही कहर वाढत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.