मेहुणबारे जवळ रस्तालूट करणारे सहा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 10:13 PM2018-05-02T22:13:40+5:302018-05-02T22:13:40+5:30
पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांना चार दिवसांची कोठडी
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव,दि.२ : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चारचाकी गाडीला अडवून लूट केल्याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना मेहुणबारे नजीक तिरपोळे फाट्यावर १ रोजी मध्यरात्री दिड वाजता घडली. अटकेतील सहाही जणांना ४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार सहा ते सात जणांचा पोलीस शोध घेत आहे.
गाडी चालक भालू शेख उस्मान (रा.मेहुणबारे) गाडी क्र.एमएच १७ वाय ३२५४ हिला घेऊन मेहुणबारेकडे जात असतांना तिरपोळ फाट्यावर करण राजेंद्रसिंग राठोड, कल्पेश राजेंद्र निकम, मयूर रामेश्वर चौधरी, कमलेश सुनिल पाटील, निखील हिरामण पाटील (सर्व रा. चाळीसगाव) यांच्यासह आणखी सहा ते सात जणांनी गाडीला अडविले. चालकाला दगड मारुन गंभीर दुखापत केली. त्याच्या खिशातील ४५ हजार रुपये रोख व महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाची मंगलपोत हिसावून घेतली. महिलेचा विनयभंगही केला.
गाडीचालकाने रात्रीच मेहुणबारे पोलिस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी रात्रीच तरुणांच्या टोळक्याचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली. अन्य मात्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. सर्व तरुण हे दारुच्या नशेत होते. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता ४ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.