आठ दिवसांत तोडल्या साठ वीजजोडण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:22 AM2021-08-28T04:22:16+5:302021-08-28T04:22:16+5:30
धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणकडून थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली ...
धरणगाव : कोरोनाच्या काळात नागरिकांचे आर्थिक संकट कोसळले आहे. महावितरणकडून थकबाकीपोटी वीजजोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आठ दिवसांत ६० जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.
वीजजोडणी तोडताना कुठल्याही हप्त्याची तरतूद केली जात नाही, त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या कठीण काळात तरी ही मोहीम थांबवण्यात यावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे. महावितरणकडून आधीच वाढीव बिले दिली जात आहेत. तसेच रोज सात ते आठ वीजजोडण्या तोडण्यात येत आहेत. वीज वितरण विभागाकडून वाढीव बिलांच्या संदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे शहरात सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.
काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वीज वितरण विभागाला वीजबिल भरण्यासाठी टप्पे पाडून देण्याची सूचना केली होती. मात्र, अधिकारी ऐकण्यास तयार नाही, अशी स्थिती आहे.
कोट
लहान माळीवाडा परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांत रोज सात ते आठ ठिकाणच्या वीजजोडण्या तोडण्यात आल्या.
- भीमराज पाटील, सामान्य नागरिक धरणगाव
कोट
आठ दिवसांत सुमारे साठ वीजजोडणी कापण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी सहा महिने, एक वर्षापासून वीजबिल भरले नाही, त्यांच्याकडील वीजजोडणी कापली जात आहे. नागरिकांनी वीजबिल लवकर भरावे.
- एम.पी.धोटे, सहायक अभियंता महावितरण धरणगाव