रुग्णाचे बिल ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच आकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:20+5:302021-04-22T04:16:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खासगी कोविड रुग्णालयातील बिले, सेवा, सुविधा तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन आदींबाबत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खासगी कोविड रुग्णालयातील बिले, सेवा, सुविधा तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन आदींबाबत आयएमए संघटनेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुषंगाने नुकतीच एमआयएच्या कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली असून, त्यात सदस्यांना ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच बाधित रुग्णांकडून बिल आकारण्यात यावे यासह इतर सूचना करण्यात आल्या आहे.
सध्या कोरोनाचा कहर वाढला आहे. कोविडच्या या वैश्विक संकटात सारं जग व मानवजात डॉक्टरांकडे फार आशेने, विश्वासाने बघत आहे. या कठीणकाळात सरकार, प्रशासन यांच्या खांदाला खांदा लावून डॉक्टर कोविडच्या रुग्णांना सेवा देत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून खासगी कोविड रुग्णालयांतील बिले, सेवा, सुविधा, शासकीय नियमांचे उल्लंघन आदींबाबत सामाजिक, राजकीय, प्रशासकीय या विविध स्तरावरून तोंडी, थेट, सोशल मीडियाद्वारे, पत्राद्वारे तक्रारी प्राप्त होत आहे. त्यावर मंगळवारी आयएमएच्या कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये सविस्तर चर्चा करून सेवा देणाऱ्या सदस्य व सदस्यांच्या हॉस्पिटलसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना आयएमएकडून करण्यात आल्या. यावेळी बैठकीत आयएमएचे अध्यक्ष डॉ. सी.जी. चौधरी व सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
काय आहेत सूचना...
- कोविडच्या रुग्णांचे बिल हे शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच आकारावेत.
- शासनाने ठरवून दिलेल्या वैद्यकीय सेवांचे दरपत्रक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावे.
- रुग्णाला, नातेवाइकांना दाखल करताना रुग्णसेवेचे दरपत्रक, अंदाजित खर्च याची ढोबळ कल्पना द्यावी.
- कोविडच्या रुग्णांच्या बिलाबद्दल काही तक्रार असल्यास प्रशासन, ऑडिटर यांची मदत घेऊन सामंजस्याने निरसन करावे.
- रुग्णांच्या तब्येतीविषयी सुधारणा किंवा बिघाड याबद्दल नातेवाइकांशी नियमित सुसंवादाने समुपदेशन करावे.
- कोविडच्या मान्यताप्राप्त बेड्स एवढे रुग्ण भरती करावे.
- रुग्णालयाच्या व्यवस्थापनात बॉम्बे नर्सिंग होम कायद्याच्या तरतुदींचे काटेकोर पालन करावे. त्या कायद्याचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- आग आणि नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणा, अनिवार्य बाबी यांची पूर्तता याबद्दल खात्री करून घ्यावी.
- कोविड रुग्णालयात पुरेसे, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉईज, असिस्टंट डॉक्टर्स व तज्ज्ञ डॉक्टर्स सेवेवर असतील याची पुरेपूर खबरदारी घ्यावी.
- आयएमए सदस्य जर असदस्यीय व्यवस्थापनाच्या कोविड रुग्णालयात सेवा देत असतील तर अशा सदस्य डॉक्टरांनी संबंधित रुग्णालयातील तपासणीबद्दलच्या आपल्या नोंदी व इतर कायदेशीर जबाबदाऱ्या याबद्दल दक्ष राहून त्यांच्या कागदोपत्री पूर्तता जाणीवपूर्वक कराव्यात. त्यामधील अपूर्णता, त्रूटी आपल्याला कायदेशीर अडचणी आणू शकतात.
-कोविड उपचारासंबंधी औषधे, बिले, सेवा, सुविधा या संदर्भातील सर्व प्रशासकीय आदेशांचे पालन करीत रेकॉर्ड अद्ययावत ठेवावेत.
- अहवाल प्राप्त कोविडग्रस्त रुग्णाला आपले रुग्णालय शासनमान्य कोविड सेंटर असल्यावरचं भरती करावे. भरती असलेला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रशासनाला कळवून योग्य ती कार्यवाही करावी.
- कोविड रुग्णालयात जर रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याचा मृत्यूचा दाखला देऊन मृतदेहाची मार्गदर्शक तत्त्वांद्वारे विल्हेवाट करण्यासंबंधी योग्य ती खबरदारी घ्यावी.