२४ गावांत कौशल्य विकास केंद्रे पंतप्रधानांच्याहस्ते आज होणार ऑनलाईन उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:10 PM2023-10-18T15:10:33+5:302023-10-18T15:11:17+5:30
ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते.
कुंदन पाटील
जळगाव : ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते. अशावेळी गावातच रोजगार निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांना स्थानिक पातळीवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून, त्या अंतर्गत महाराष्ट्रात ५०० गावात यामध्ये जळगाव जिल्ह्यात २४ ग्रामपंचायतीत कौशल्य विकास केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन १९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्यात उद्घाटन होत असलेल्या २४ ग्रामपंचायतीच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऑनलाईन ऐकण्याची व्यवस्था राहणार आहे. १९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यक्रम ऑनलाईन पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे जिल्ह्यातील निमंत्रक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त वि.जा.मुकणे हे आहेत.
मारुळचा नकार...किनगावचा होकार
परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि.या संस्थेकरवी मारुळ (यावल) येथे केंद्र स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र ग्रामपंचायतीने मात्र असमर्थता दाखविल्याने हे केंद्र किनगावला स्थापन होणार आहे. लोकसंख्या आणि दळणवळणाच्यादृष्टीने किनगाव सोयीस्कर असल्याने प्रशासनानेही याच ग्रामपंचायतीला प्राधान्य दिले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात वय वर्षे १८ ते ४५ दरम्यान इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांना सहभागी होता येणार आहे.कौशल्य विकास केंद्रात विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, प्लंबिंग, मोबाईल रिपेअरिंग, सुतारकाम, कॉम्प्युटर आदीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.