आभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 02:44 PM2018-08-25T14:44:34+5:302018-08-25T14:45:00+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘सहज सुचलं म्हणून’ या सदरात चोपडा येथील शिक्षिका लिहिताहेत...

The sky | आभाळ

आभाळ

googlenewsNext


न कोसळताच पुढे निघून गेलेलं आभाळ फुरगटून बसलेल्या राधेच्या डोळ्यात तरी सापडत असावं का नंतर? काही क्षणापूर्वीच तर पदराचं एक टोक दातात घेतलेल्या राधेच्या तळव्याखाली एकवटले होते सारे ढग.
नखाने माती दूर सारण्याचा अवकाश आणि मग सुरू होईल कोसळधार, असं वाटून उगाच घाई केली कृष्णाने हात हातात घेण्याची. तिच्या कानातले डूल उगाच जरा हेलकावले आणि वाऱ्याला मिळाला अवकाश हवं तसं बागडायला.
कृष्णाच्या मोरपीसाचे रंग आणि राधेच्या कांकणांच्या काचांचे बिलोरी स्वप्न हे शेवटी एकाच कॅनव्हासवर येणार आहेत हे पावसाला तरी कुठे ठाऊक होतं म्हणा. तो पाच पावलं पुढे जाऊन विसावला जरा आणि इकडे मात्र मनधरणीचा सायंउत्सव सुरू झाला. राधेला पाऊस हवाय आणि मुरलीच्या स्वरात भिजलेला कृष्णही! कृष्णाला राधा हवीय आणि पावसाची तिच्या डोळ्यात उतरलेली रिमझीमही !!
एका क्षणी राग विसरून कृष्णाभोवती हात लपेटून उभी असलेली राधा पावसाला इंद्रधनूसारखी वाटली आणि तो परतून आला त्याच्याही नकळत. यमुनेच्या किनारी उमटलेल्या राधा कृष्णाच्या पाऊलखुणा पावसाने ओंजळीत घेतल्या... आणि रानातल्या प्रत्येक पानावर लिहून टाकल्या कायमच्याच !
रात्रभर तो हवा तसा कोसळला, हवा तसा बागडला. रामप्रहरी स्वत:च स्वत:ला ऐकत निवांत पहुडलेला पाऊस मात्र दोघांनाही सापडलेला नाही आजवर कधीही ! न कोसळता पुढे निघून गेलेलं आभाळ आणि कोसळूनही हाती न आलेलं आभाळ हे जन्मोजन्मीचं संचित आजही कुठल्याच राधा आणि कृष्णाला चुकलेलं नाहीय म्हणे !
-योगिता पाटील, चोपडा

Web Title: The sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.