धरणगाव तालुक्यातील नांदेड प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 05:56 PM2019-01-22T17:56:01+5:302019-01-22T18:05:36+5:30
सुदैवाने कोणाला इजा नाही
धरणगाव / नांदेड, जि. जळगाव : धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील जीर्ण झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुमजली इमारतीतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर असलेल्या व्हरांड्यावरील गॅलरीजवळचा काही भाग अचानक कोसळला. ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने सकाळी झालेल्या या घटनेमुळे कोणालाही दुखापत झाली नाही.
नांदेड प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकेदायक बनली असून मंगळवारी सकाळी वैद्यकीय अधिकाºयांच्या कक्षासमोरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी होती. मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. आरोग्य केंद्राच्याच इमारतीवर उपचार करण्याची वेळ आली असल्याची चर्चा आहे. आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेवून आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी मागणी केली जात आहे.
धोकादायक इमारत
नांदेड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला ४५ वर्ष पूर्ण झाले असून ती जीर्ण होऊन धोकेदायक बनली आहे. या धोकादायक इमारतीतच वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचारी रुग्णांना सेवा देत आहेत. असे असले तरी याकडे संबधित विभागाचे लक्ष नसल्याचा आरोप केला जात आहे.