लसीकरणासाठीचा स्लाॅट काही सेकंदात होतोय बुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:16 AM2021-05-10T04:16:17+5:302021-05-10T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. मात्र, नोंदणी होऊनही जिल्ह्यात केंद्रच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ ते ४४ वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. मात्र, नोंदणी होऊनही जिल्ह्यात केंद्रच मिळत नसल्याने अडचणीचे ठरत आहे. जळगावातील रहिवासी असलेले तरूण जिल्ह्यात मिळेल त्या केंद्रांवर लस घ्यायला जात असल्याने वाद वाढले आहेत. शहरातील तरूण ग्रामीणमध्ये, तर ग्रामीणमधील शहरामध्ये असे विरोधाभासी चित्र या केंद्राच्या निवडीवरून समोर आले आहे. केंद्र अगदी काही सेंकदात बुक हाेत असल्याने याच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
प्रशासनाने कळविल्यानुसार तरूण सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ऑनलाईन बसून असतात. मात्र, केंद्रावर क्लीक करण्याआधीच केंद्र बुक होऊन जात असल्याने हा नेमका काय प्रकार आहे, अशी विचारणा तरूणांकडून होत आहे ? त्यातच आता सिक्युरिटी कोडचा नवा ऑप्शन आल्याने तो टाकेपर्यंत केंद्र बुक होत असल्याने नेमकी लस आता मिळणार कधी? दिवसभर ऑनलाईन बसून राहायचे का? असा प्रश्न तरूणांमधून उपस्थित केला जात आहे. यात काहीतरी मार्ग काढावा व लसीकरण मोहीम सुलभ करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
मंगळवारपासून नवे केंद्र
मंगळवारपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी शहरात नवीन केंद्र राहणार असून, ४५ पेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांसाठी वेगळे केंद्र राहणार आहे. यात गणपती नगरातील स्वाध्याय भवनात, मेहरूण परिसरातील मुलतानी हॉस्पिटलमध्ये १८ ते ४५ वयोगट, तर शनिपेठ येथील शाहीर अमरशेख रुग्णालयात तसेच कांताई नेत्रालय येथे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण होणार आहे.