जामनेर पं.स.सभापतींच्या खुर्चीला चपलांचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:42 PM2019-12-09T23:42:10+5:302019-12-09T23:43:16+5:30
टाकळी येथे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनाऐवजी जयंती असा उल्लेख केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी सभापतींच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला. दरम्यान, सभापतींनी अनावधानाने हा उल्लेख झाल्याचे नमूद करून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील टाकळी येथे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनाऐवजी जयंती असा उल्लेख केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी सभापतींच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदविला. दरम्यान, सभापतींनी अनावधानाने हा उल्लेख झाल्याचे नमूद करून झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
सभापतींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिले. यावेळी भगवान सोनवणे, रवींद्र बाविस्कर, रत्नाकर जोहरे, गणेश सपकाळे, सुभाष निकम आदी उपस्थित होते.
भावना दुखावण्याचा हेतू नव्हता
सभापती नीता पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मी मोठी वक्ता नसून, दोन शब्द बोलण्यासाठी उभी राहिली. त्यात अनावधानाने महापरिनिर्वाणऐवजी माझ्याकडून जयंती असा उल्लेख झाला. त्यात कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. उलट महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे मी आज तालुक्याचे नेतृत्व करीत आहे. झाल्या प्रकरणाने मला मोठा मनस्ताप झाला आहे. तरी समाज बांधवांंनी माजी चूक पदरात घेऊन मला क्षमा करावी, असे सांगितले.
यावेळी उपसभापती एकनाथ लोखंडे, नवल पाटील, सुरेश बोरसे, कमलाकर पाटील, रमण चौधरी, गोपाल नाईक आदी उपस्थित होते.