भ्रष्टाचार, बुरशीयुक्त शेवयांवरून जळगाव जि.प.मध्ये गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:35 PM2018-06-22T12:35:14+5:302018-06-22T12:35:14+5:30
सदस्यांनी विचारला जाब
जळगाव : जि.प. तील लघुसिंचन विभागातील भ्रष्टाचार, बुरशीयुक्त शेवयांच्या पुरवठादारावर कारवाई करण्याबाबत होत दिरंगाई, सभेच्या चुकीच्या नोंदी तसेच ग्रामसेवकांवर कारवाई करण्यास होणारा विलंब यासह विविध विषयांवरून जि.प. ची सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली. या विषयांवरून जि.प.च्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्यावर प्रश्नाचा भाडीमार करीत जि.प. सदस्यांनी जाब विचारला. बुरशीयुक्त शेवयांच्या अहवालावरून तासभर चाललेल्या चर्चेनंतर अखेर पुरवठादारावर दोन दिवसात गुन्हे दाखल करण्यात येईल असे सीईओंनी सांगितले.
गुरुवारी जि.प.ची सर्वसाधारण सभा श्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सभेचे सचिव अकलाडे उपस्थित होते. या वेळी सर्व गटविकास अधिकारी उपस्थित आहे का, असा मुद्दा उपस्थित झाल्याने सीईओंनी त्या बाबत विचारणा केली. त्या वेळी जामनेरचे गटविकास अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले.
सत्कारावरून जोरदार चर्चा
अधिकाºयांचा सत्कार करण्यात आल्याने सुनसगाव बंधाºयाचे निकृष्ट काम उजेडात आणणारे जि.प. सदस्य लालचंद पाटील, पल्लवी सावकारे यांचा सत्कार करण्यात यावा अशी मागणी जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी केली. त्यावर नाना महाजन यांनी आक्षेप घेतला व इतर सदस्य निकृष्ट काम करतात का असा सवाल उपस्थित केला. त्या वेळी पोपट भोळे यांनी नाना महाजन यांचे नाव घ्या, असे सूचविले. त्यावर महाजन यांनी नकार दिला. त्या वेळी नंदकिशोर महाजन यांनी उत्कृष्ट जि.प.पटू पुरस्कार देऊ अशी टिपणी केली. त्यामुळे सत्कारावरूनही बºयाचवेळ चर्चा रंगली.
आचारसंहितेचा बाऊ का?
मागील सभेचे इतिवृत्त मंजुरीबाबत चर्चा सुरू होताच प्रभाकर सोनवणे यांनी या सभेत तीनच विषय का घेतले, असा सवाल उपस्थित केला. या बाबत आचारसंहितेचा बाऊ केला जात असल्याचे त्यांनी सांगत आचारसंहितेबाबत कोणते निर्देश आहेत ते वाचून दाखविले. असे असतानाही मंजूर विषय का थांबविले जातात असा सवाल उपस्थित करीत केवळ आचारसंहितेचा बाऊ करून बैठकांमध्ये झालेले विषयदेखील विषय पत्रिकेत न घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावल पं.स.च्या कर्मचाºयांचे निवासस्थान पाडण्याबाबत विषय झाला असताना ते का पाडले नाही, पावसाने भींत पडली तर? असे सांगत अशा कामांसाठी आचारसंहिता आडवी येते का असा सवालही उपस्थित केला. मागील बैठकीतील धोरणात्मक विषय मंजूर करू नये का, असा सवाल नाना महाजन यांनी उपस्थित केला. त्यावर विषय द्या, ते आचारसंहिता कक्षाला कळवू, असे सीईओ दिवेकर यांनी सांगितले. असे आहे तर टिपणीही का मंजूर केली, असा सवाल प्रभाकर सोनवणे यांनी उपस्थित केला व चहा, नाश्त्यासाठी सभा घेतात का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. इतर विषय आजच्या सभेत का ठेवले नाही, त्याचे कारण नमूद करावे, असा मुद्दा सोनवणे यांनी लावून धरला.
अर्थसंकल्प मंजुरीवरून जोरदार चर्चा
मागील सभेतील अर्थसंकल्प मंजुरीच्या मुद्यावर नाना महाजन, रवींद्र पाटील, रावसाहेब पाटील, शशिकांत साळुंखे यांनी आक्षेप घेत धोरणात्मक विषय घ्यायचे असल्याने आता आचारसंहितेमुळे त्यास मंजुरी देऊ नये असा चिमटा नाना महाजन यांनी काढला. त्या वेळी वरील सदस्य व पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाली. अखेर त्यात त्रुटी असतील त्या दूर करू असे भोळे यांनी सांगितले.
अंथरुण झटका, विंचू बाहेर काढा
ग्रामसेवकांच्या कामातील अनियमितता व गैरकारभारच्या मुद्यावरून पल्लवी सावकारे यांनी प्रश्न उपस्थित करीत त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा जाब विचारला. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने भुसावळ तालुक्यातील खडके येथील सरपंचासह सर्वच सदस्यांना उपोषणास बसावे लागल्याचा मुद्दा मांडला. जि.प.तील अंथरुण झटका मोठे विंचू बाहेर पडतील व त्या पाठोपाठ लहान विंचूही समोर येतील असा सल्ला त्यांनी सीईओंना देत जि.प.तील गैरकारभाराबाबत संताप व्यक्त केला. त्या वेळी नंदकिशोर महाजन यांनीही कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर सीईओ दिवेकर यांनी गटविकास अधिकाºयांना हे अधिकार दिले असल्याचे सांगितले.
अधिकाºयांनी व्यक्त केली दिलगिरी
जिल्ह्यात होणाºया कामांच्या देयकाबाबत मागील सभेच्या वेळी झालेल्या चर्चेची नोंद त्या सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.ए. बोटे यांनी चुकीची नोंद केल्याबद्दल सदस्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय स्तरावर असे काम होत असेल तर कसे चालेल असा प्रश्न करीत बोटे यांना कार्यमुक्त करण्याची मागणी केली. अखेर बोटे यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली व या विषयावर पडदा पडला. ठेकेदारांमुळे अशा चुकीच्या नोंद होत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
हातपंप दिले भेट
जिल्ह्यात बोअरवेल करून ठेवले असले तरी त्याठिकाणी हातपंप का बसविले जात नाही असा सवाल उपस्थित करीत या वेळी रावसाहेब पाटील, नाना महाजन, शशिकांत साळुंखे, रवींद्र पाटील यांनी हातपंपाची प्रतिकृती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीईओ यांना भेट दिली. दिरंगाई करणाºया अधिकाºयांवर कारवाईची मागणी या वेळी त्यांनी केली.
पोषण आहाराप्रमाणे शेवयातही रॅकेट
जिल्ह्यात अंगणवाड्यांना पोषण आहारात पुरवठा करण्यात आलेल्या बुरशीयुक्त शेवयांवरून सभेत दोन वेळा जोरदार वादंग झाले. संंबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे स्थायी सभेत ठरेलेले आहे. त्यानंतर शासनाला काय अहवाल पाठविला, अशी विचारणा नंदकिशोर महाजन यांनी महिला व बाल विकास अधिकारी आर.आर. तडवी यांना केली. त्या नंतर तडवी यांनी अहवाल वाचवून दाखविण्यास सुरुवात केली. त्यात सभेत गुन्हा दाखल करण्याचा संदर्भ नसल्याचे लक्षात येताच महाजन यांच्यासह रावसाहेब पाटील यांनी संताप व्यक्त करीत अधिकाºयांवरच कारवाईची मागणी केली. सर्व पुरावे असताना काय कारवाई असा त्यांनी सीईओंना विचारला. अखेर बºयाच चर्चेनंतर पुरवठादावर दोन दिवसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीईओ दिवेकर यांनी दिले. या वेळी सदस्यांनी शेवयाच सीईओंपुढेठेवल्या.
खाजगी शाळांच्या गणवेश खरेदीच्या सक्तीबाबत रवींद्र पाटील यांनी मुद्दा उपस्थित करीत अशा शाळांवर कारवाईची मागणी केली. शाळा सांगत असलेल्या दुकानांवर अव्वाच्या सव्वा दराने गणवेशाची विक्री होत असल्याने संस्थाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्या वेळी अशा शाळांवर कारवाईबाबत गटशिक्षणाधिकाºयांना निर्देश दिले असल्याचे शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांनी सांगितले. खाजगी शाळेत प्रवेश देऊ नये असे ठरले असताना तेथे मुलांना प्रवेश दिला जात असल्याने त्यांना सील करण्यात यावे अशी मागणी प्रताप पाटील यांनी केली.
शिक्षक बदल्यांमध्ये बोगस अपंग शिक्षक दाखविल्याचा मुद्दाही नाना महाजन यांनी उपस्थितकेला.
शिलाई मशिनच्या निधीचे काय करायचे
शिलाई मशिन वाटपासाठी ३५९ प्रस्ताव मंजूर केले असताना केवळ ९३ जणांचे देयके आले आहे. त्याचा निधी ३० जूनपर्यंतच वाटप करायचा असताना इतर देयके न आल्याने त्या निधीचे काय करावे असा सवाल नाना महाजन यांनी उपस्थित केला.