सर्वपक्षीयचा नारा देऊन, स्वबळाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:35+5:302021-08-24T04:22:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा बँकेची निवडणूक पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून, ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्वपक्षीय ...

With the slogan of all-party, preparation for self-reliance | सर्वपक्षीयचा नारा देऊन, स्वबळाची तयारी

सर्वपक्षीयचा नारा देऊन, स्वबळाची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा बँकेची निवडणूक पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून, ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची सहमती घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इतर पक्षांनीदेखील सर्वपक्षीय पॅनलची घोषणा करण्याआधी पक्षांतर्गत बैठक घेऊन पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सर्वपक्षीयचा नारा देऊन आता प्रत्येक राजकीय पक्षाने स्वबळाची तयारी सुरू केल्याची माहिती जिल्हा बँकेच्या सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आता नव्याने मतदार यादी बनविण्याचे काम सुरू आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान होणारी पैशांची उलाढाल पाहता सर्वपक्षीय नेत्यांनी गेल्या पंचवार्षिकप्रमाणेच या वेळेसदेखील ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्राथमिक बैठकांना सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन यांना एकत्र आणण्याची कसरत इतर पक्षांतील नेत्यांना करावी लागणार आहे. महाजन-खडसे एकत्र आल्यानंतरच ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची तयारी पूर्ण, मात्र बिनविरोधसाठी आग्रही

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेने यंदा चांगल्या प्रकारे तयारी केली असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली रणनीती तयार केली आहे. तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचेही काम सुरू आहे. तयारी सुरू ठेवून बिनविरोध निवडणूक करण्यासाठीदेखील शिवसेना आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जागावाटपात किंवा काही जागांबाबत चर्चा फिस्कटल्यास स्वबळाचीही तयारी शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे.

सर्वपक्षीयबाबत अद्याप निर्णय नाही - भाजप

सर्वपक्षीय पॅनलबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती भाजपचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सुरेश भोळे यांनी सांगितले आहे. एकीकडे भाजपकडून सर्वपक्षीयबाबत इतर पक्षांच्या नेत्यांसोबत बैठकांचे सत्र सुरू ठेवले असताना दुसरीकडे मात्र पक्षांतर्गत बैठका घेऊन इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन पक्षाकडून स्वबळाचीदेखील तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपकडे २१ जागांसाठी उमेदवार तयार असून, काही जागांवर भाजपमध्येच रस्सीखेच असल्याने पक्षाने स्वबळाची तयारीदेखील सुरू केल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका लवकरच जाहीर करू - ॲड. रवींद्र पाटील

सर्वच पक्षांनी सर्वपक्षीयचा नारा देऊन स्वबळाची तयारी केली असल्याने राष्ट्रवादीनेदेखील आता येत्या दोन दिवसांत पक्षाच्या नेत्यांचा बैठकीचे आयोजन केले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा जाणून घेऊनच पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: With the slogan of all-party, preparation for self-reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.