रस्त्याची संथ ‘गती’ व्यापार, उद्योगाच्या मुळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:48 PM2019-07-14T12:48:59+5:302019-07-14T12:49:24+5:30
विजयकुमार सैतवाल जळगाव : जळगाव -औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ ...
विजयकुमार सैतवाल
जळगाव : जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे जळगावच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा फटका बसत असून या रस्त्याच्या संथ गतीचामुळे सर्व हैराण झाले आहेत. त्यामुळे हा रस्त्याच्या गती येणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेचा फटका वाहनधारकांसह उद्योग क्षेत्रांना बसू लागला असून जळगावातील दालमिलमधून मराठवाड्यात दररोज जाणाऱ्या २०० टन डाळचीही वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून थांबली आहे. सोबतच लातूरसह वेगवेगळ््या भागातून येणारा कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.
जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी या रस्त्याचे काम जवळपास दीड वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले. त्यात जामनेर तालुक्यातील नेरीपासून या कामाला सुरुवात होऊन हळूहळू थेट औरंगाबादपर्यंत संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूने खोदून ठेवण्यात आला. रस्ता तर खोदला गेला मात्र काँक्रीटीकरण, डांबरीकरणाच्या कामाने गती काही घेतली नाही. त्यामुळे गेल्या एक वर्षापेक्षा जास्त काळापासून वाहनधारकांसह व्यापारी, उद्योजकांना या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
जळगावातील दालमिलमधून विदेशात डाळ निर्यात होण्यासह देशातही विविध भागात जाते. त्यात शेजारीच असलेल्या मराठवाड्यात दालमिलचा माल मोठ्या प्रमाणात जातो. मात्र जळगाव-औरंगाबाद रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अवजड वाहतूक करणे जिकरीची ठरत आहे. परिणामी या मार्गावरून डाळ, धान्याची वाहतूक करणे सध्या वाहनधारक टाळत आहे. जळगाव येथून पहूरसह सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणात डाळ जाते. सोबतच मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यात तिला मागणी आहे. त्यामुळे जळगावातून दररोज १५ ते २० ट्रकद्वारे त्या भागात डाळची वाहतूक केली जात असे. मात्र रस्त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली व जवळपास २०० टन डाळीची वाहतूक थांबली आहे.
जळगावात ५० ते ५५ दालमिल असून येथे दररोज ७०० ते ८०० टन कच्चा माल लागतो. आधीच सरकारने एप्रिल महिन्यात कडधान्याच्या आयातीवर निर्बंध घातल्याने केवळ १५ टक्केच कच्चा माल विदेशातून आयात करता येत आहे. हे प्रमाण कमी होण्यासह आता औरंगाबाद, लातूर, सिल्लोड या भागातून येणारा हरभरा, तूरही येत नसल्याने त्याचा परिणाम होत आहे. लातूर येथील तूरला अधिक मागणी असल्याने तेथील कच्च्यामालापासून तयार तूर डाळ उत्पादनावरही अधिक भर असतो. मात्र सध्या या तुरीसह कच्चामालही येत नसल्याने दालमिलला दुहेरी फटका बसत आहे.