आयटीसह सर्वच क्षेत्रात मंदीची दाहकता वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:58 PM2019-12-09T12:58:40+5:302019-12-09T12:59:23+5:30
विजयकुमार सैतवाल । जळगाव : तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे अनेकांच्या हातचे काम जात आहे. आगामी काळात आयटीसह सर्वच क्षेत्रात ...
विजयकुमार सैतवाल ।
जळगाव : तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे अनेकांच्या हातचे काम जात आहे. आगामी काळात आयटीसह सर्वच क्षेत्रात मंदीची दाहकता आणखी वाढणार आहे, असे संकेत नामवंत लेखक व आय.टी. तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
गोडबोले हे रविवारी एका कार्यक्रमासाठी जळगावात आले असता त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्या वेळी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद
प्रश्न - तंत्रज्ञानाने आयटी क्षेत्रात बदल जाणवत आहे का?
उत्तर - हो मोठा बदल झाला आहे. तंत्रज्ञानात आज मोठ्या वेगाने बदल होत आहे. त्यानुसार समाज असो अथवा व्यक्ती या प्रत्येकाने स्वत:ला बदलले नाही तर तो बाजूला फेकला जाईल, नवतंत्रज्ञान न स्वीकारल्याने अनेक मोठ्या कंपन्या बाहेर फेकल्या गेल्या आहेत, त्यामुळे बदल न स्वीकारणाऱ्यांची आज काय स्थिती आहे, हे सर्वांसमोर आहे.
‘आयटी सिटी’ म्हणून बंगळुरु पाठोपाठ पुण्याचाही झपाट्याने विकास झाला. मात्र तेथेही आज या क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
प्रश्न - तंत्रज्ञानामुळे रोजगाराची काय स्थिती आहे?
उत्तर - देशात मंदी आहेच, यात काही शंका नाही. त्या तुलनेत आयटी क्षेत्रात ती कमी आहे. या क्षेत्रातील प्रोग्रामिंग, टेस्टींगमधील नोकºया कमी झाल्या आहेत. यात आता दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने भविष्यात अजून ६७ टक्के नोकºयांवर गडांतर येण्याची भीती आहे.
प्रश्न - तंत्रज्ञानामुळे वाचन संस्कृतीवर काही परिणाम होत आहे का?
उत्तर - सध्या वाचन कायम आहे, मात्र यामध्ये साहित्य वाचन राहिले नसून सोशल मीडियावर व्हायरल होणाºया ‘पोस्ट’चे वाचन होत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग होणे अपेक्षित असताना जो-तो साध्या-साध्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतो व ते वाचले जाते. त्यामुळे दर्जेदार वाचन कोठे राहिले आहे?.
तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही. मात्र त्याचा योग्य वापर केला जावा. अन्यथा सध्याची स्थिती पाहिली तर या सोशल मीडियामुळे भावी पिढीचे भवितव्य अंधकारमय होण्याची चिन्हे आहे.
प्रश्न - विविध क्षेत्रात मंदी येत असल्याने संगीत, कला, साहित्य हे क्षेत्र तरुणाईला खुणावत आहे का?
उत्तर - कोणते क्षेत्र कसे आहे, या विचार करीत पैशासाठी काम करू नये. त्यापेक्षा सुखी, आनंदी आयुष्यासाठी आपल्याला जे आवडेल ते काम करा. तुमच्याकडे काय आहे, त्यापेक्षा तुम्ही कसे आहात हे ओळखा.
प्रश्न - ‘मनात’, ‘अर्थात’, ‘मुसाफीर’ असे वेगळे नावेच आपण पुस्तकासाठी का निवडतात?
उत्तर - ही नावे मला अचानक सुचतात. मुळात मला एक शब्द असणारेच नावे आवडतात. त्यामुळे अशी नावे निवडतो.
प्रश्न - आगामी कोणते पुस्तक येणार आहे?
उत्तर - ‘रक्त’, ‘व्हिटॅमिन’ यासह कायद्याच्या इतिहासाबद्दल ‘माय लॉर्ड’, विज्ञानावर आधारीत ‘सूक्ष्मजंतू’ ही पुस्तके येणार आहेत. या सोबतच आगामी पाच वर्षात किमान २० उत्कृष्ट दर्जाची पुस्तके वाचकांच्या हाती देण्याचा मनोदय आहे.