गुरांच्या बाजारावर मंदीचे सावट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:08 PM2018-05-26T23:08:38+5:302018-05-26T23:08:38+5:30
चारा-पाण्याची टंचाई : पशुपालनावरही परिणाम, आवक होऊनही व्यवहार अत्यल्प
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव, जि.जळगाव, दि. २६ : तालुक्यात दुष्काळ सदृश्यस्थिती असल्याने त्याचे संभाव्य परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. २६ रोजी शनिवारी गुरांच्या बाजारावर मंदीचे सावट होते. आवक होऊनही खरेदी-विक्रीचे व्यवहार फारसे होऊ शकले नाही. चारा-पाण्याच्या झळा बसू लागल्याने पशुपालनावर याचा परिणाम होत आहे. मंदी असल्याने दरही कोसळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
तालुक्यात यंदा ८६ टक्केच पाऊस झाल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके मार्चपासून जाणवू लागले आहेत. याशिवाय चाराटंचाईने डोके वर काढल्याने दावणीच्या गुरांसमोर काय ठेवायचे? या वणव्याने पशुपालक त्रस्त आहेत. चाºयाचा प्रश्न जटील झाला आहे. त्यात टंचाईची स्थिती दिवसागणिक वाढल्याने पशुधन पोसणे शेतकºयांना अवघड झाले आहे. यामुळेच शनिवारी गुरांच्या बाजारात चांगली आवक होऊनही व्यवहार तुरळक झाले. भाव नसल्याने शेतकºयांना पशुधन आल्यापावली माघारी न्यावे लागले. खरिपाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याने काहीअंशी व्यवहार झाले.