तरुणांनी काढला गटारीतील गाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:38 PM2019-11-18T12:38:26+5:302019-11-18T12:38:47+5:30
जळगाव : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे गावात पसरलेले अनारोग्य लक्षात घेऊन सोशल मीडियावर सक्रीय रामराज्य ग्रुपच्या तरूणांनी ...
जळगाव : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटारी आणि त्यामुळे गावात पसरलेले अनारोग्य लक्षात घेऊन सोशल मीडियावर सक्रीय रामराज्य ग्रुपच्या तरूणांनी रविवारी चक्क फावडे हातात घेतले. त्यांच्यामुळे कित्येक दिवसांपासून गटारीत साचलेला गाळ बाहेर निघाल्याबरोबर ग्रामपंचायतीचा नाकर्तेपणा देखील चव्हाट्यावर आला आहे.
सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याच्या उद्देशाने कार्यरत रामराज्य ग्रुपच्या तरुणांनी समाजकार्याचा वसा घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सुटीच्या दिवशी रविवारी टीव्ही किंवा मोबाईलवर वेळ वाया घालविण्यापेक्षा शासन किंवा स्थानिक ग्रामपंचायतीकडून दुर्लक्षित समस्या सोडविण्यावर या तरुणांनी भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून विदगाव तसेच जळगाव रस्त्यावरील खड्डे स्वखर्चाने बुजण्याचे पाऊल त्यांनी नुकतेच उचलले.अशीच वाईट अवस्था गटारींची झाली असून, ममुराबाद गावात डेंग्युसह अन्य बऱ्याच आजारांचे रूग्ण आढळून आले आहे.
ग्रुपचे सदस्य गोपाळ पाटील, कुणाल पाटील, निखील पाटील, हर्षल पाटील, दीपक चौधरी, घन:श्याम निकम, कनिष्क पाटील, पंकज पाटील, गणेश मिश्रा, प्रतिक गावंडे आदी तरुणांनी बसस्थानक परिसरात तुंबलेल्या गटारी साफ केल्या.