बाप्पाच्या चरणी दरवळतो आठ टन अगरबत्तीचा सुगंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:35 PM2019-09-07T12:35:17+5:302019-09-07T12:37:09+5:30
अगरबत्तीची मागणी चारपटीने वाढली
जळगाव : लाडक्या बाप्पाच्या आगमनाने बाजारपेठेत चैतन्य असून वातावरण प्रसन्न करणाऱ्या अगरबत्तीचीही मागणी चारपटीने वाढली आहे. शहरात दररोज जवळपास आठ टन अगरबत्तीची विक्री होऊन आठ लाख रुपये किंमतीचा सुगंध या निमित्ताने घरोघरी व मंडळात दरवळत आहे.
आनंददायी पर्व घेऊन येणाºया गणरायाच्या स्वागतासाठी विविध वस्तूंसह प्रसाद व पूजा साहित्याचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. घरोघरी तसेच वेगवेगळ््या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये सकाळ-संध्याकाळ आवश्यकता असते ती अगरबत्तीची. त्यामुळे नेहमी मंदिरात व धार्मिक विधीसाठी भक्तीभावाने लावली जाण्याºया अथवा कोणतेही कार्यालय, दुकान या ठिकाणी वातावरण प्रसन्न करणाºया अगरबत्तीला गणेशोत्सवासाठी मागणी चांगलीच वाढली आहे.
मागणी चारपट
जळगाव शहरात एरव्ही दररोज दोन टन अगरबत्तीची विक्री होते. मात्र गणेशोत्सवाच्या काळात ही विक्री आठ टनावर पोहचली आहे. नेहमी केवळ सकाळ-संध्याकाळ घरी, मंदिरात लावली जाणारी अगरबत्ती गणेशोत्सवात मंडळाच्या ठिकाणीही लावली जाते. त्यामुळे या मागणीत जास्त भर पडत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
विविध प्रकार व आकारातील अगरबत्ती
बाजारात सध्या नेहमीच्या अगरबत्तीसोबतच १६ इंची, १९ इंची, दोन फुटी, ३ फुटी अगरबत्तीदेखील आलेल्या आहेत. सोबतच ‘गोल्डन’ अगरबत्तीची विक्री होत आहे. मोठ्या आकारातील ही अगरबत्ती एकवेळा लावली की ती साधारण दिवसभर चालते.
गुजरातच्या अगरबत्तीला वाढली मागणी
बंगलुरू येथून पूर्वी जळगावात जास्त प्रमाणात अगरबत्ती येत असे. मात्र दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही अनेक शहरात अगरबत्तीचे उत्पादन होऊ लागल्याने महाराष्ट्रातील नागपूर, नाशिक या शहरातून तसेच गुजरात, मध्यप्रदेशातील उज्जैन येथूनही अगरबत्ती जळगावात येते. यात गुजरातच्या अगरबत्तीची जास्त विक्री होते, असेही विक्रेत्यांनी सांगितले.
दोन टन कापूरची ज्योत
अगरबत्तीसोबतच गणेशोत्सवासाठी दररोज दोन टन कापूरची विक्री होत आहे. सध्या एक हजार ३०० रुपये प्रती किलो असा कापूरचा होलसेल भाव असून किरकोळ बाजारात तो १६०० ते १७०० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे भाव स्थिर आहे, मात्र तीन वर्षांपूर्वी कापूरचे दर ४०० ते ४५० रुपये प्रती किलो होते. त्यावर जीएसटी लागल्यानंतर त्याचे भाव वाढतच गेले व आता हे भाव तीन पट झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात अगरबत्तीची मागणी चारपटीने वाढली आहे. तसेच कापूरची विक्री वाढली आहे.
- ललित बरडिया, अगरबत्ती कापूर होलसेल विक्रेते.