प्रांतांवर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियाच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:19 AM2021-03-01T04:19:13+5:302021-03-01T04:19:13+5:30
जळगाव : फैजपूर प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा ज्ञानेश्वर नामदेव कोळी (रा. कोळन्हावी ता. यावल) याला ...
जळगाव : फैजपूर प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला धडक देऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा ज्ञानेश्वर नामदेव कोळी (रा. कोळन्हावी ता. यावल) याला स्थानिक गुन्हे शाखा व फैजपूर पोलिसांनी विटनेर, ता.चोपडा येथून शनिवारी अटक केली. दरम्यान त्याला न्यायालयाने १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फैजपूर उपविभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्यावर २४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता न्हावी गावाच्या गावठाण शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांनी वाहनाला धडक देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेत डंपरचा मालक व घटनास्थळावर चालकाला सहकार्य करणारा मुख्य वाळूमाफिया ज्ञानेश्वर नामदेव कोळी हा फरार झाला होता. कोळी हा चोपडा तालुक्यातील विटनेर येथे लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, तपास अधिकारी प्रकाश वानखडे, उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, अमलदार किरण चाटे, विकास सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे नरेंद्र वारुळे, अनिल इंगळे, रमेश चौधरी, रवींद्र गायकवाड, नितीन बाविस्कर व अविनाश देवरे यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून ज्ञानेश्वर कोळी याला विटनेर येथून ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेतील इतर दोन आरोपी अद्यापही फरार आहे.