चाळीसगाव येथील स्मिता बच्छाव ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 07:30 PM2019-01-06T19:30:55+5:302019-01-06T19:31:51+5:30
खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे मुंबईत चाळीसगाव येथील युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
चाळीसगाव, जि.जळगाव : खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे मुंबईत चाळीसगाव येथील युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना ‘खान्देश मराठा कन्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खान्देश मराठा पाटील मंडळातर्फे वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्यात सामाजिक, क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रात अभिनव कामगिरी करणाऱ्या समाजधुरीणांना खान्देश भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यात चाळीसगावच्या युगंधरा फाउंडेशनच्या संस्थापिका स्मिता बच्छाव यांना खान्देश मराठा कन्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी खान्देश मराठा पाटील मंडळाचे संस्थापक डॉ.बाळासाहेब मोहने, अध्यक्ष देवीदास बोरसे, सचिव विश्वनाथ पाटील, खासदार कपिल पाटील, आमदार किसनराव कथोरे, आमदार सीमा हिरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. चाळीसगासहून शरद पाटील, छाया पाटील, नंदू पवार, दीपक पवार, बापू पाटील व बच्छाव परिवार आदी उपस्थित होते.
समाज घटकातील महिला सक्षम व सर्वगुणसंपन्न होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व जनसेवा करणाºया पोलीस दलाच्या कुटुंंबातील सदस्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे हा उदात्त हेतू ठेवून स्मिता बच्छाव यांनी युगंधरा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या कार्यात्मक बांधणी केली आहे. यात होममिनिस्टर व गरबा नृत्य स्पर्धा या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्य मर्यादित न ठेवता अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.
शाडू मातीपासून गणपती मूर्तीची कार्यशाळा, हळदीकुंकू, सबलीकरण कार्यक्रम, नेत्रदान आणि अवयवदानासाठी जनजागृतीपर आवाहन, पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वितरण, आरोग्यदायी चला धावू या स्पर्धा, आत्महत्या रोखण्यासाठी समूपदेशन, मूकबधिर शाळेतील साजरा केलेल्या बालदिनासोबत कुमारिका पूजन, चिमणी वाचवा अभिनव संदेश, ग्रामीण भागातील मुलींसाठी सॅनीटरी नॅपकीनचे वितरण व जनजागृती, निसर्गसहल असे अनेकविध उपक्रमातून स्मिता बच्छाव यांनी आपल्या कार्याचा ठसा रोवला आहे.
यापूर्वी देखील स्मिता बच्छाव यांच्या कार्याची दखल घेत स्त्री शक्तीपीठ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. यात जळगाव येथे सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांत हिरकणी पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले होते.