स्मिता वाघ की करण पवार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:18 AM2019-03-13T11:18:51+5:302019-03-13T11:19:49+5:30

उमेदवारीसाठी रस्सीखेच

Smita Wagh ke Karan Pawar? | स्मिता वाघ की करण पवार ?

स्मिता वाघ की करण पवार ?

Next
ठळक मुद्दे दिल्ली दरबारी दोन नावे रवाना


जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघासाठी भाजपाकडून आमदार स्मिता वाघ व पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील कथित आरोपांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार बदलाची हवा गेल्या पंधरा दिवसांपासून या पक्षात सुरू होती त्या पार्श्वभूमीवर ही दोन नावे आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तारखांचा उत्सुकता राजकीय पक्षांना होती. आता तारखांची उत्सुकता संपून उमेदवार कोण? याबाबत उत्सूकता लागून आहे.
उमेदवारीसाठी रस्सीखेच
भाजपाकडून जळगाव लोकसभा मतदार संघात खासदार ए.टी. पाटील, आमदार स्मिता वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व बांधकाम व्यावसायिक प्रकाश पाटील यांची नावे चर्चेत होती. पक्षातील वेगवेगळ्या वरिष्ठ नेते मंडळींकडून यातील काही जणांसाठी प्रयत्न सुरू होते. मुंबईत पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. काही आरोपांच्या पार्श्वभूमीचा या बैठकीत गांभीर्याने विचार झाल्याचे समजते.
नेते मंडळींकडून प्रयत्न
बैठकीनंतर दोन नावे पुढे आली. यात पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांच्यासाठी काही स्थानिक नेत्यांनी शक्ती लावली तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे आमदार स्मिता वाघ यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजते. अंतिम यादीत ही दोन नावे दिल्ली दरबारी पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे.
कोण आहेत स्मिता वाघ
स्मिता वाघ या विद्यार्थी परिषद चळवळीतून भाजपात आल्या आहेत. अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे ग्रा.पं.सरपंच, जि.प. सदस्य, जि.प. अध्यक्ष व विधान परिषदेत आमदार अशी त्यांची वाटचाल आहे.
पक्षाची राज्यस्तरावरील विविध पदे त्यांनी भुषविली आहेत. भाजपाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या त्या पत्नी आहेत.
कोण आहेत करण पवार
करण पवार हे मुळचे पारोळा तालुक्यातील आहेत. त्यांचा राजकीय वारसा मोठा आहे. वडिल पूर्वी जि.प. सदस्य होते तर आजोबा आमदार होते. सद्य स्थितीत काका डॉ. सतीश पाटील हे राष्टÑवादीचे विद्यमान आमदार आहेत.
मतदार संघातील पारोळा, भडगाव, एरंडोल तालुक्यात ‘पवार-पाटील’ कुटुंबाचा चांगला होल्ड असल्याचे तसेच पाचोरा तालुक्यातील माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह काही बड्या नेत्यांशी नातेससंबंधांची जोड त्यांनी मांडल्याचे समजते.
ते सध्या नगराध्यक्ष असले तरी त्यापूर्वी राष्टÑवादीचे नगरसेवक होते. नातेसंबंधांच्या जोरावर विविध पक्षांकडूनही छुप्या मदतीची समिकरणे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मांडल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन - तीन दिवसात भाजपाकडून नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.
रक्षा खडसे कायम...
रावेर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडून दिल्ली दरबारी पाठविण्यात आल्याचेही बोलले जात आहे. या मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी निवडणूक लढवावी असा एक प्रयत्न झाला. मात्र खडसे यांनी त्याला नकार दिल्याने रक्षा खडसे यांना पुन्हा संधी निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
दोन्ही मतदार संघात महिलांना संधी
कथित आरोपांचे विरोधी पक्षाकडून भांडवल होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपाकडून दोन्ही मतदार संघात महिलांना संधी देण्याचे प्रयत्न आहेत. विरोधकांकडून कोणतेही भांडवल केले जाऊ नये व महिला मतदारांना खूश करण्याचा यातून प्रयत्न असल्याचे बोलले जाते. यात आता दिल्लीचे श्रेष्ठी काय निर्णय घेतात? याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Smita Wagh ke Karan Pawar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.