चोपडा तालुक्यातील भवाडे येथील इसमास झोपेतच सर्पदंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:53 PM2018-07-28T12:53:18+5:302018-07-28T12:53:42+5:30
जळगाव : रात्री घरात झोपलेले असताना कालू धनू भील (४०, रा. भवाडे, ता. चोपडा) यांच्या बनियानमध्ये शिरुन सपाने दंश केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. भील यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या संदर्भात भील यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कालू भील हे आपल्या कुटुंबीयांसह घरात झोपलेले होते. त्या वेळी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्यांच्या कंबरेला सपाने दंश केला. कपड्यांमध्ये काय आहे म्हणून घाबरुन जात भील उभे राहिले व बनियान झटकली. त्या वेळी साप खाली पडला. मात्र तोपर्यंत त्याने भील यांच्या कंबरेला दंश केलेला होता.
सर्पदंश झाल्यानंतर जवळपास दोन तास परिसरात घरगुती उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांना चोपडा येथे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार भील यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.