पहूरच्या शेतकऱ्याला सर्पदंश; उपचारासाठी फिरफिर झाल्याने गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:12 AM2021-07-19T04:12:49+5:302021-07-19T04:12:49+5:30
जळगाव : पहूर, ता.जामनेर येथील विनोद फकिरा चौधरी (वय ४८) या शेतकऱ्याला रविवारी शेतात फवारणी करीत असताना विषारी सापाने ...
जळगाव : पहूर, ता.जामनेर येथील विनोद फकिरा चौधरी (वय ४८) या शेतकऱ्याला रविवारी शेतात फवारणी करीत असताना विषारी सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर लहान भावाने त्यांना तातडीने पहूर रुग्णालयात नेले, त्यांनी प्राथमिक उपचार करुन जिल्हा रुग्णालय अर्थात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथे आणल्यावर डॉक्टरांनी उपचार न करता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. या दोघांच्या सल्ल्यानुसार चौधरी यांची फिरवाफिरव झाली अन् डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडले. सरकारी यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा हा नमुना पुन्हा समोर आला. चौधरी यांना वेळीच उपचार मिळाले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.
या घटनेबाबत मृत विनोद यांचे भाऊ योगेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दोघं भाऊ शेतात फवारणीचे काम करीत असताना गवतात मोठे भाऊ विनोद यांच्या पायाला सर्पदंश झाला. पायाला काही तरी लागल्याचे त्यांनी योगेश यांना सांगितले. त्यांनी काही त्रास होतोय का म्हणून विचारणा करुन पाय बघितला असता काटा टोचल्यासारखी एक खूण दिसली. थोड्याच वेळात त्रास होऊ लागल्याने योगेश यांनी भावाला पहूर ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार करुन जळगावला हलविण्याचा सल्ला दिला. तेथील सरकारी रुग्णवाहिकेतून विनोद यांना शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यांना तपासून डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. तेथे पोहचण्यापूर्वीच रस्त्यात त्यांनी प्राण सोडले. तेथील डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर पुन्हा त्यांना शासकिय रुग्णालयात आणण्यात आले.
...तर प्राण वाचले असते
भाऊ विनोद यांच्यावर पहूर किंवा जळगाव शासकीय रुग्णालयात तातडीने उपचार केले असते तर माझ्या भावाचे प्राण वाचले असते, मात्र सरकारी यंत्रणेने उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देऊन उपचारास टाळाटाळ केली, असा आरोप योगेश यांनी केला. दरम्यान, शासकीय रुग्णालय कोविड रुग्णालय असल्याने येथे डॉक्टरांची कमतरता जाणवत असून रविवारी तर परिस्थिती अत्यंत बिकट असते. रविवारी सर्पदंशाचे तीन रुग्ण आले होते. विनोद यांच्या पश्चात पत्नी कल्पना, मुलगा कुणाल, पवन, मुलगी गौरी व अक्षदा असा परिवार आहे.