लग्नाला गेलेल्या विमा सल्लागाराच्या घरात चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 07:49 PM2018-07-17T19:49:29+5:302018-07-17T19:52:22+5:30
चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़
जळगाव- चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़ याप्रकरणी बेहेडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़
प्रदीप बेहेडे हे हरेश्वरनगरात पत्नी मंगला यांच्यासह वास्तव्यास आहेत़ विमा सल्लागार म्हणून ते काम करतात़ १४ जुलै रोजी चुलत भावाच्या मुलीचे लग्न असल्यामुळे १३ रोजी रात्रीच ते घराला कुलूप लावून पत्नीसह पुणे येथे गेले. त्यामुळे घरात कुणीही नव्हते़ १४ तारखेला लग्न आटोपून बेहेडे हे नातेवाईकांकडेच थांबले़ चोरट्यांनी बंद घराच्या लोखंडी दाराचा कडी-कोयंडा कापून आतल्या लाकडी दाराचे कुलूप टॉमीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला़ घरातील सामान फेकून चोरट्यांनी दागिने शोधण्याचा प्रयत्न केला़ घरात दागिने आढळून न आल्यामुळे चोरट्यांनी कपाटातील दहा हजार रूपयांची रोकड व दोन मोबाईल तसेच दोन लहान कॅमेरे घेऊन पोबारा केला़