तर व्यापाऱ्यांचे अर्थकारणच संपेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:18+5:302021-04-09T04:17:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सद्यःस्थितीत सर्व व्यवसायात आता कुठेतरी नियमितता येत आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सद्यःस्थितीत सर्व व्यवसायात आता कुठेतरी नियमितता येत आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापाऱ्यांचे अर्थकारण संपणार आहे. सध्या व्यवसायात अनेक अडचणी आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जरी लॉकडाऊन मान्य आहे. तर सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते सहा अशी व्यवसाय करण्याची वेळ ठरवून देण्याची मागणी व्यापारी शिष्टमंडळाने केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळाने गुरूवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली त्यावेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, संत हरदासराम मर्चंट असोसिएशन, संत कवरलाल मार्केट पदाधिकारी, सेंट्रल फुले मार्केट व्यापारी संघ, संत गोधडीवाला रेडिमेट कापड मार्केट संघ, शहर ऑप्टिकल दुकानदार संघटना यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच चाळीसगाव सराफा असोसिएशनचे नीलेश सराफ, चाळीसगाव रेडीमेड व्यापारी संघटनेचे सुरेश तलरेजा, प्रिंटिंग प्रेस असोसिएशनचे नीलेश पिंगळे, विवेक येवले, जळगाव येथील व्यापारी मोहन मंदानी, संजय विसराणी,राकेश पिंजानी, विलास माळी, दिलीप मेहता, शंकर तलरेजा, नामदेव मंधानी, भूषण शिंपी विविध व्यापारी असोसिएशनचे उपस्थित होते.
कर्जाचे हप्ते, व्यावसायिक बँक खात्याचा भरणा,कर्मचाऱ्यांचे पगार, कालबाह्य होणारे मालाचा स्टॉक अशा अनेक समस्यांनी व्यापारी, उद्योजक, कामगार घेरला गेला आहे. यातून मार्ग काढावा लागेल. शनिवार रविवार लॉकडाऊन मान्य असुन सोमवार ते शुक्रवार दहा ते सहा अशी वेळ ठरवून द्या. अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली.
यावेळी व्यापाऱ्यांच्या मागण्या रास्ता असून त्यांना विशिष्ट वेळ ठरवून दिल्यास त्यावेळेस ती त्यांची व्यापारी आस्थापने सुरू ठेवतील. शासन आणि व्यापारी समन्वयाची गरज असून आम्ही लोकप्रतिनिधी देखील आपल्या सोबत असून मार्ग काढावा लागेल, अशी विनंती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केली.
त्यासोबतच व्यापाऱ्यांनीही आपल्या भावना मांडल्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी समन्वयातून मार्ग काढू, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली. मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी व्यापाऱ्यांना सहकार्य केले जाईल असे सांगितले.