पुनखेडा पुलाचे भिजत घोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 11:04 PM2020-06-26T23:04:10+5:302020-06-26T23:04:18+5:30
सहा वर्षांपासूनचा प्रश्न : विधीमंडळात मंजुरीला कोरोनाचा गतिरोधक
रावेर : गत सहा ते सात वर्षांपूर्वी अतिवृष्टीत आलेल्या महापुरात भोकर नदीवरील रावेर - मुक्ताईनगर मार्गावरील पूल वाहून गेला होता. तद्नंतर या पुलाला अनेकदा डागडुजी करत नवीन पुलाच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबत गत सहा- सात वर्षांपासून मंत्रालयात या पुलावरून अनेकदा ‘पुराचे पाणी’ वाहून गेल्याची शोकांतिका असून भिजत घोंगडे पडल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
विशेषत: मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील, खासदार रक्षा खडसे व तालुक्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी आगामी विधीमंडळ अधिवेशनात या पुलाच्या सुमारे सहा कोटीच्या अंदाजपत्रकाला तत्वत: मान्यता मिळवली असली तरी कोरोनाचा गतिरोधक बाजूला सारून या प्रस्तावाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
गत सहा ते सात वर्षांपूर्वी भोकर नदीला अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात रावेर - मुक्ताईनगर मार्गाचा हा पूल खचून वाहून गेल्याने सदर रस्त्यावरील वाहतूक थोपवण्यात आली आहे.
पावसाळ्याखेरीज नदीपात्र कोरडेठाक असताना पुलाला पर्याय म्हणून नदीपात्रातून रहदारी सुरू असते.
जि.प. बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत डांबरीकरण करण्यात आला. मात्र, सदर पुलाच्या गंभीर दैनावस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
तत्कालीन व विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे या पुलाची तातडीने दुरुस्ती करून सदर पुलाचा नवीन बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, सन २००९ मध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर सत्तांतर होऊन दिवंगत माजी खासदार हरिभाऊ जावळे हे निवडून आले होते.
गत पाच वर्षात या पुलाच्या नवीन बांधकामाच्या सहा कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला तत्वत: मंजुरी मिळाली आहे.
या दरम्यान दुरुस्त केलेल्या पुलाचा मध्यवर्ती भाग गतवर्षी पुन्हा खचल्याने त्या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे.