साबण, तेल स्वस्त, कॉस्मेटीक महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 11:28 AM2017-08-04T11:28:02+5:302017-08-04T11:29:10+5:30
वस्तू व सेवा कराचा परिणाम : दोन महिन्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होणार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 4 - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी)अंमलबजावणीनंतर नित्य उपयोगाच्या बहुतांश वस्तूंच्या भावामध्ये घट झाली आहे. यामध्ये पेस्ट, आंघोळीचा साबण, केसांचे तेल, टूथब्रश यांचा समावेश असून कॉस्मेटीक वस्तू महागल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे खाद्य तेलावरील कर कमी झाल्याने त्याचेदेखील दर कमी झाले आहे तर साखरेवरील कर ‘जैसे थे’ असला तरी तिचे भाव वाढले आहे. दरम्यान, जीएसटीचा खरा परिणाम जाणवण्यासाठी अजून दोन महिने लागतील, असेही काही विक्रेत्यांनी सांगितले.
जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होतील, असे सांगितले जात होते. त्यासंदर्भात दररोज लागणा:या वस्तूंच्या दराबाबत माहिती घेतली असता वस्तूंचे दर कमी जास्त होण्यासह मालाचा तुटवडा असल्याचेही चित्र दिसून येत आहे.
दररोज उपयोगी पडणा:या खाद्य तेलावर पूर्वी सहा टक्के व्हॅट लागत असे, आता यावरील कराचे प्रमाण कमी होऊन जीएसटी पाच टक्के लागत आहे. एक टक्क्यांचाच फरक असल्याने जास्त प्रमाणात भाव कमी झाले नसले तरी ज्या ठिकाणी जास्त तेलाचा उपयोग होतो, त्या ठिकाणी मोठा दिलासा मानला जात आहे.
पूर्वी साखरेवर पाच टक्के उत्पादन शुल्क लागत असे, आता जीएसटीमध्येही एवढाच कर आहे. साखरेवरील कर जैसे थे असला तरी आज साखरेच्या भावात दोन ते तीन रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.
आंघोळीचे साबण, कपडय़ांचे साबण, केसांचे तेल यांचे भाव पाच टक्क्याने कमी झाले आहेत. टूथपेस्टमध्ये तर सात ते आठ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे या वस्तूंचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
कॉस्मेटीकवर 28 टक्के कर
कॉस्मेटीक वस्तूंवरील कर तर थेट 13 टक्क्यांवरून 28 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे श्ॉम्पू, कंडीशनर, उच्च दर्जाचे डिटजर्ट पावडर, परफ्यूम इत्यादी कॉस्मेटीक वस्तू महागल्या आहेत.
दरांमध्ये अजूनही फरक
जीएसटी लागू होण्यास एक महिना झाला तरी अद्यापही भावांमध्ये फरक आहे. काही ठिकाणी पूर्वीचाच माल असल्याने तो त्याच भावाने तर नवीन माल जीएसटीच्या परिणामासह विक्री होत आहे. त्यामुळे एखाद्या वस्तूचे भाव कोठे कमी तर कोठे जास्त आहे.
दहीवरील कर हटविला तरी भाववाढ
एखाद्या कंपनीने वस्तूचे मूळ भाव वाढविले तर जीएसटीचा फायदा होऊ शकणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. याचे उदाहरण म्हणजे पूर्वी दह्यावर मूल्यवर्धीत कर लागत असे मात्र आता त्यावर जीएसटी नाही. तरीदेखील दह्याचे भाव वाढले आहे. याला कारण म्हणजे एका नामांकीत दही उत्पादक कंपनीने दह्याच्या मूळ किंमतीतच वाढ केली आहे.
जीएसटीमध्ये अनेक वस्तूंवरील कर कमी झाल्याने त्यांचे भाव कमी तर काहींचे कर वाढल्याने भाव वाढले आहेत. काही ठिकाणी जुना माल असल्याने व काही ठिकाणी नवीन माल आल्याने भावांमध्ये फरक आहे.
-अनिल कांकरिया, सुपरशॉप संचालक.
दररोज उपयोगात येणा:या अनेक वस्तूंचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. उत्पादकांनी वस्तूंचे मूळ भाव वाढविले तर जीएसटीचा ग्राहकांना फायदा होऊ शकणार नाही. दोन महिन्यानंतर जीएसटीचा खरा परिणाम दिसून येईल.
- नितीन रेदासनी, सुपरशॉप संचालक.
जीएसटीनंतर काही दुकानदारांकडे पूर्वीचा माल असेल. त्यामुळे अनेक वस्तूंच्या भावामध्ये फरक दिसून येतो.
- ललित बरडिया, अध्यक्ष, एकता रिटेल किराणा असोसिएशन.