सोशल मीडिया सेल महिनाभरात जळगावात कार्यान्वित होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:14 PM2018-09-28T12:14:01+5:302018-09-28T12:15:26+5:30
अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची माहिती
जळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महिनाभरात सोशल मीडिया सेल कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली.
अपर पोलीस अधीक्षकपदी जळगावात रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच मतानी यांनी गुरुवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. घरफोडी, चोºया, सायबर गुन्हे यासह नालासोपारा प्रकरणात साकळी येथील दोघांना झालेली अटक याबाबत तसेच पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांची माहिती मतानी यांनी यावेळी दिली. त्यांच्याशी झालेला संवाद असा...
जळगाव येथे नुकतेच सायबर पोलीस स्टेशन सुरू झालेले आहे. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी व उच्चशिक्षित तथा संगणकाचे ज्ञान अवगत असलेल्या १६ कर्मचाºयांची मुलाखत घेऊन नियुक्ती करण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल असून त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. यामुळे तांत्रिक पुरावे उपलब्ध होत असल्याने तपासाला गती मिळणार आहे. गुन्हे सिध्दीचे प्रमाणही वाढेल, असा विश्वास लोहित मतानी यांनी व्यक्त केला.
अनुभवी व नव्या कर्मचाºयांचा मेळ घालून गुन्हे उघडकीस आणणार
घरफोडी, चोºया या नियमित गुन्ह्यांच्या व्यतिरिक्त नवीन पद्धतीचे गुन्हे घडत आहेत. तसेच सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सहायक फौजदार, हवालदार यांचे अनुभव कौशल्य व नवीन भरती झालेले उच्चशिक्षित कर्मचारी यांच्यात मेळ घालून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नियोजन केलेले आहे. सायबर पोलीस ठाण्यात आवश्यक ती यंत्रसामग्री उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे आता यापुढे जिल्ह्यातील सर्व सायबरशी निगडित गुन्हे या पोलीस ठाण्यातच दाखल केले जाणार आहेत.
गुन्हेगारांचे दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरू
जिल्ह्यात दुचाकी चोरी व घरफोडी यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांचे दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. या गुन्हेगारांना हेरल्यानंतर नवीन गुन्हेगारांवर आपोआप नियंत्रण मिळविणे शक्य होईल. या गुन्हेगारांच्या हालचाली टिपणे, रात्रीची गस्त वाढविली जाणार आहे. आरएएफआयडी या यंत्राच्या माध्यमातून पोलिसांची गस्त तपासली जाणार आहे. या यंत्रामुळे कर्मचाºयांवर अंकुश ठेवणे शक्य होते.
ंलोकसंख्येच्या तुलनेत मनुष्यबळाची कमतरता
लोकसंख्येच्या आधारावर पोलीस ठाण्यांना पदे मंजूर केली जातात. सध्याचे मनुष्यबळ १९९० मध्ये असलेल्या लोकसंख्येच्या आधारावर देण्यात आले आहे. रावेर, फैजपूर व वरणगाव येथे त्या तुलनेत कर्मचाºयांची संख्या अपूर्ण आहे. त्यासाठी संबंधित पोलीस निरीक्षकांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. साकळी येथील दोन तरुणांना एटीएसने अटक केल्यानंतर जिल्ह्यात अशा घटनांमध्ये कोणाचा सहभाग आहे का? अशा व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा घटनांमधील संशयित एका दिवसात पुढे येत नाही. वर्षानुवर्षे त्यांचे कार्य सुरू असते, असेही मतानी म्हणाले.