ग्राहकांसोबतच्या संपर्कासाठी महावितरणला सोशल मीडियाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:58+5:302021-01-10T04:12:58+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध प्रिंट माध्यमांचा वापर करत ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) ग्राहकांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया आणि विविध प्रिंट माध्यमांचा वापर करत आहे. तसेच ग्राहकांना त्यांच्या अडचणी व समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी महावितरणतर्फे तक्रार निवारण केंद्र व संपर्कासाठी नि:शुल्क दूरध्वनी सेवाही कार्यान्वित केली आहे.
खान्देशात महावितरणचे साडेअकरा लाख घरगुती ग्राहक आहेत. यामध्ये सर्वाधिक ६ लाख ८६ हजार ४०१ ग्राहक जळगाव जिल्ह्यात आहेत. तसेच धुळे जिल्ह्यात ३ लाख १२ हजार ३९० ग्राहक असून, नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ७४ हजार १३४ ग्राहक आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने महावितरणतर्फे ग्राहकांच्या घरोघरी जाऊन रीडिंग न घेता, तीन महिने सरासरी बिले देण्यात आली. मात्र, देण्यात आलेले बिल हे जादा रकमेचे असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी महावितरणकडे केल्या होत्या. या तक्रारींबाबत महावितरणने कशा पद्धतीने सरासरी वीजबिल आकारण्यात आले आहे, याची सविस्तर माहिती सोशल मीडियाच्या विविध साधनातून व वृत्तपत्रांमधून ग्राहकांपर्यंत पोहोचविली आहे. यामुळे अनेकांचे समाधान झाल्याने तक्रारीही कमी झाल्या आहेत.
महावितरणचे जनमित्रही ग्राहकांपर्यंत पोहोचून, त्यांनी विजबिलाबाबत नागरिकांच्या तक्रारी दूर करण्याचे काम केल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी दिली.