भगवान महावीर जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:57+5:302021-04-25T04:15:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज, रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध समाजोपयोगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त आज, रविवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले असून, समाजबांधवांसाठी घरबसल्या मुनीश्रींच्या प्रवचनाचाही लाभ होणार आहे. कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी मिरवणूक व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
भगवान महावीर जयंतीनिमित्त जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मिरवणुकीसह मान्यवरांचे प्रवचन होऊन विविध स्पर्धांचेदेखील आयोजन केले जाते. मात्र, गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द झाले होते. त्यानंतर यंदादेखील मिरवणूक व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
परंपरा अखंडित राहावी म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत पद्मभूषण जैन आचार्य विजय रत्नसुंदरसुरीजी महाराज यांच्या डहाणू येथील प्रवचनाचे थेट प्रक्षेपण समाज बांधवांना पाहता येणार आहे. यासाठी जैन युवा फाउंडेशनच्या वतीने समाज बांधवांना लिंक पाठविण्यात आली आहे.
नवीन उपक्रमांचा प्रारंभ
कोरोनाच्या संकटामध्ये सर्वांना मदत व्हावी, या उद्देशाने श्री जैन युवा फाउंडेशनच्या वतीने महावीर जयंतीच्या मुहूर्तावर कोविड हेल्पलाईनचा प्रारंभ करण्यात येणार आहे. यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरण, प्लाझ्मा दात्यांची माहिती एकत्रित करणे याचादेखील प्रारंभ आज, रविवारी होणार आहे.
गोमाता पूजन
सकाळी साडेदहा वाजता पांझरपोळ संस्थान येथे मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत गोमाता पूजन करण्यात येऊन लापसी दान केले जाणार आहे. यासोबतच शहरातील दुर्बल घटकांना सुभाषचंद्र पगारिया, प्रवीण पगारिया यांच्यावतीने सकाळी ११ वाजता अन्नदान (गौतम प्रसादी) केले जाणार आहे.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी घरीच राहून नवकार मंत्र जाप व धार्मिक विधी करावा, असे आवाहन श्री जैन युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराचा समारोप
भगवान महावीर जयंतीनिमित्त २१ ते २५ एप्रिल असे पाच दिवस आयोजित रक्तदान शिबिराचा आज समारोप होणार आहे. कांताई सभागृहामध्ये २१ एप्रिलपासून सकल जैन श्री संघ, श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती, भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन, जैन सोशल ग्रुप गोल्ड यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ ते दुपारी एक या दरम्यान दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली. या शिबिराचा आज समारोप होणार आहे.