समाजाने ठरवलं अन् कुटुंब पुन्हा उभं राहिलं! दिव्यांग मुलांना मिळाला आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 06:29 AM2021-06-15T06:29:10+5:302021-06-15T06:29:30+5:30
कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही.
- जिजाबराव वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव ( जळगाव) : समाजाने दातृत्वाची ओंजळ धरली तर कोरोना महामारीतही कुटुंब पुन्हा उभे राहू शकते, याचा प्रत्यय चाळीसगावपासून अवघ्या आठ किमी अंतरावर असणाऱ्या पातोंडा या गावातील कुटुंबाला आला. अनेकांच्या दातृत्वामुळे येथील गोकुळ भिल व कदमबाई भिल या दांपत्यासह तीन दिव्यांग मुलांचेही पुनर्वसन करण्यात यश आले आहे. पिचलेल्या या कुटुंबाला हक्काचा निवारा तर मिळालाच, सोबत रोजगारही उपलब्ध झाला आहे. सोमवारी भिल दांपत्याला दहा शेळ्या सुपुर्द करण्यात आल्या.
कोरोनामुळे रोजगार बुडाल्याने पातोंडा येथील गोकुळ भिल आणि कदमबाई भिल यांच्यासमोर संकटांचे डोंगर निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की, घरातील तीनही मुले भुकेने व्याकुळ होत. मात्र घरात काहीच नसल्याने चार दिवस चूल पेटली नाही. ही स्थिती कळताच या कुटुंबासाठी स्वयंदीप दिव्यांग भगिनी मंडळाच्या प्रमुख मीनाक्षी निकम यांनी सोशल माध्यमावर मदतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी भिल कुटुंबाचे पुनर्वसन करत त्यांना दत्तक घेतले.
वाळेकर यांनी या कुटुंबाला शासनाच्या मदतीची गरज पडू नये असा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजही पुढे आला. सैनिकांच्या ग्रुपने भिल कुटुंबाचे पडके घर उभारून दिले, तर दीपक निकम या वीज कर्मचाऱ्याने थकीत वीजबिल भरून घरात विजेचा प्रकाश पसरवला. काहींनी धान्य व किराणा भरून दिला. वर्षभर पुरेल इतके किराणा सामानही मिळाले आहे.
‘लोकमत’चाही खारीचा वाटा
गोकुळ भिल यांच्या दयनीय परिस्थितीचा आढावा ‘लोकमत’नेही मांडला होता. त्यामुळे समाजमनाच्या संवेदना पाझरल्या. कुटुंबाच्या पुनर्वसनात ‘लोकमत’चाही खारीचा वाटा आहे, अशी प्रतिक्रिया नंदकुमार वाळेकर व मीनाक्षी निकम यांनी व्यक्त केली.
मी माणसांच्या रूपात आज देव पाहत आहे. कोरोनात रोजगार बुडाल्यानंतर निराश झालो होतो. तीन दिव्यांग मुलांसह पत्नीचे पोट कसे भरायचे, हा प्रश्न डोंगराएवढा झाला होता. घर पडून गेले होते. वीज नव्हती. आज देवरूपी माणसांनी आम्हाला नव्याने जगण्याची ऊर्जा दिली आहे. - गोकुळ भील, पातोंडा, ता. चाळीसगाव.