समाजाने हिणवलं... नियतीनं दुखावलं... ‘चाँद’ने मात्र आयुष्यालाच झुंजवलं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:05 AM2023-03-22T11:05:56+5:302023-03-22T11:06:33+5:30

भुसावळच्या चाँद सरवर तडवी ऊर्फ बेबोची ही गाथा. जी पोलिस भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार आहे. 

Society hurt... Destiny hurt... But 'Chand' fought life itself...! | समाजाने हिणवलं... नियतीनं दुखावलं... ‘चाँद’ने मात्र आयुष्यालाच झुंजवलं...!

समाजाने हिणवलं... नियतीनं दुखावलं... ‘चाँद’ने मात्र आयुष्यालाच झुंजवलं...!

googlenewsNext

- कुंदन पाटील

जळगाव : वंशाचा दिवाही नाही आणि प्रकाश पेरणारी पणती जन्मली म्हणून कुणी म्हटलं नाही. तृतीयपंथी म्हणूनच आली ‘चाँद’ जन्माला... नियतीही नित्यनियमाने संकटे पेरत होती. संकटांनीच लढायला शिकवलं... म्हणून तर वेदनांच्या गढीवर उभारलेल्या गुढीवर ‘चाँद’ सरसावला आहे विजयी पताका फडकवायला... भुसावळच्या चाँद सरवर तडवी ऊर्फ बेबोची ही गाथा. जी पोलिस भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार आहे. 

जन्म १९९४ मधला. आजी, आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार. वयाच्या दहाव्याच वर्षी चाँदला फसव्या प्रेमाने हेरलं आणि ‘किन्नर’ आहे कळताच क्षणात दूर सारलं. तेव्हा ‘चाँद’ला धक्का बसला.  ती भुसावळच्या किन्नरी मठात जात गेली आणि ‘किन्नर’पण अभ्यासत गेली. चाँदने धुळ्यातील यल्लम्मा मातेचा जोगवा स्वीकारला.

चाँदच्या आजीचा २०१५ मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. पाठोपाठ २०२१ मध्येही आईला कर्करोगाने हेरले. तेव्हा ‘चाँद’चे आयुष्य संकटांच्या ढगात दडले. आईने कुशीत घेतलं आणि तिन्ही बहिणींसह भावाची तूच आता माता हो म्हणून सांगत जगाचा निरोप घेतला. तेव्हा चाँद रेल्वेत पैसे मागत गेली आणि घरसंसार सुरू ठेवत गेली. धुळ्यातील गुरुवर्य पार्वती परसराम जोगी यांचा चेला बनलेल्या चाँदला नीलू गुरू, शमीभा पाटील, समाधान तायडे  यांनी सुखकर वाटेवर नेले. म्हणून ती फर्दापूर (औरंगाबाद) महाविद्यालयातून शैक्षणिक प्रवाहात राहिली.

...म्हणे क्लासमध्ये प्रदूषण होईल..!
सरावासाठी मैदान गाठले तेव्हा तिथेही हीनवणारे होतेच. काहींनी वेश्याव्यवसायासाठी तिचा हात धरला; पण मैत्रीण आम्रपालीने तिला सुखरूप परत आणले. इरफान शेख यांनी चाँदचा हात धरला व तिला मैदानावर उतरविले. काहींनी अभ्यासक्रमाच्या दाराशी नेले व तयारी करून घेतली.

राज्यातून ‘चाँद’ पहिली
भरतीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये ‘थर्ड जेंडर’ म्हणून ती पात्र ठरली. १७ मार्चला मैदानही जिंकले. आयुष्यभर सत्त्वपरीक्षा देणारी चाँद २ एप्रिलला लेखी पेपर देणार आहे. भरतीसाठी ‘तृतीयपंथीय’ उमेदवार म्हणून ती पहिलीच आणि राज्यातून एकमेव.

धुळ्यातील पोलिस भरती सर्वांत आधी सुरू झाली. त्यामुळे भरतीत सहभागी होणारी ती पहिलीच होती. शासन निर्णयानुसार तिला संधी दिली आहे. तिची जिद्द पाहून सर्वांनाच आनंद वाटला.
    - संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक, धुळे

Web Title: Society hurt... Destiny hurt... But 'Chand' fought life itself...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव