भुसावळात खड्डे बुजवताना मुरुमाऐवजी माती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 06:59 PM2020-08-31T18:59:37+5:302020-08-31T19:01:54+5:30
रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येत आहे, मात्र डागडुजी करण्यासाठी टाकण्यात येणारा 'मुरूम' नव्हे तर माती असल्याने शिवसेनेने चक्क रस्त्यावर उतरून मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले
भुसावळ : शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची अमृत योजनेच्या जलवाहिनी टाकल्याने व सततच्या पावसाने पूर्णत: वाट लागली आहे. याबाबत ‘लोकमत'ने वारंवार पाठपुरावा करून शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येत आहे, मात्र डागडुजी करण्यासाठी टाकण्यात येणारा 'मुरूम' नव्हे तर माती असल्याने शिवसेनेने चक्क रस्त्यावर उतरून मुरूम टाकण्याचे काम बंद पाडले
भुसावळ शहरातील जळगाव व जामनेर रोडवरील रस्त्याचे डागडुजीचे काम माती मिश्रित मुरूम टाकून निकृष्ट दर्जाचे होत आहे म्हणून परिसरातील नागरिकांनी ठेकेदाराला रस्त्याचे काम थांबवा म्हणून मज्जाव केला. तरीही ठेकेदाराने काम सुरूच ठेवले. त्यामुळे त्या भागातील दोन शिवसैनिकांना नागरिकांनी बोलावले. माती बघून शिवसैनिकांनी काम बंद करण्यासाठी सांगितले. तरीसुद्धा ठेकेदार त्यांना जुमानत नव्हता म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना, तेथे जाऊन निकृष्ट दर्जाचे काम थांबवा, अशा सूचना द्याव्या लागल्या. पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चंद्रावर यांनासुद्धा माहिती शिवसैनिकांनी दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार भुसावळ पालिकेने रस्त्याची डागडुजी करण्याचा ठेका संबंधित ठेकेदाराला दिला. पण ठेकेदाराने मुरुमाऐवजी काळी माती वापरली आहे. संपूर्ण जळगाव रोड विभागातसुद्धा असेच काम झाले असून, सोमवारी अष्टभुजादेवीसमोर भरलेला ट्रक शिवसैनिकांनी रोखला. उत्तम दर्जाचे काम करा, नागरिकांनी कर भरलेला आहे, त्यांच्या जीवाशी खेळू नका, असे ठेकेदाराला सांगितले. तेव्हा त्यांनी हा मुरूम आहे, काळी माती नाही असे सांगितले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, शहरप्रमुख बबलू बºहाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, धनराज ठाकूर उपशहरप्रमुख पवन नाले, उपतालुकाप्रमुख हिरामण पाटील, उपजिल्हा संघटक अल्पसंख्याक सईद मुल्लाजी, कैलास पाटील राहुल बावणे यांनी निकृष्ठ काम थांबण्याचा सूचना दिल्या. गड्ड्यात भरलेल्या मातीत पाणी टाकून दाखवले व निकृष्ठ काम सुरू असल्याचे सिद्ध करून दाखवले.
ठेकेदारावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारचे देयक दिले जाणार नाही व यापुढे त्याला काळ्या यादीत टाकले जाईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
गय करणार नाही-शिवसेना
चार वर्षात अशाच प्रकारची निकृष्ट कामे झालेली आहे म्हणून रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. निकृष्ट कामे करणाºयांची गय केली जाणार नाही, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले.
रस्त्यांच्या डागडुजीसाठी वापरण्यात येणारा मुरूम निकृष्ट दर्जाचा मातीमिश्रित होता. मातीचे नमुने घेऊन पालकमंत्र्यांच्या माध्यमात परीक्षणासाठी पाठवणार आहे. निकृष्ट दर्जाचे काम मुळीच खपवून घेतले जाणार नाही. ठेकेदाराचे काम रद्द करण्यात आले असून, नवीन निविदा काढून २-४ दिवस लेट पण थेट काम करण्यात येईल. ठेकेदाराचे बिले थांबवण्याच्या सूचना केल्या आहेत.
-संदीप चिद्रवार, मुख्याधिकारी, नगरपालिका, भुसावळ