पाण्याचा निचरा होण्यासाठी मातीचा भराव काढण्यात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:13 AM2021-06-03T04:13:31+5:302021-06-03T04:13:31+5:30
''प्रभाव लोकमत''चा : बोगदा न उभारल्याने शेतात तुंबले आहे पाणी जळगाव : रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करताना, ...
''प्रभाव लोकमत''चा : बोगदा न उभारल्याने शेतात तुंबले आहे पाणी
जळगाव : रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम करताना, शिरसोलीच्या पुढे दापोरा शिवारात पाण्याचा निचरा होण्यासाठी बोगदा न उभारल्याने पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातचं तुंबले आहे. या प्रकाराबाबत ‘लोकमत’ने बुधवारी शेतकरी बांधवांच्या होत असलेल्या नुकसानीबाबत वृत्त प्रकाशित केल्याने, या वृत्ताची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी तिसऱ्या लाईनच्या कामासाठी उभारलेला मातीचा भराव काढण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मनमाड दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाचा पहिला टप्पा शिरसोलीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पूर्ण झाला असून,शिरसोलीच्या पुढे तिसरा मार्ग उभारण्यासाठी जमीन सपाटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र,रेल्वे प्रशासनातर्फे या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने शेतातील पाण्याचा निचरा होणारा जुना बोगदा बुजून पुन्हा तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी रूळ टाकल्यानंतर नवीन बोगदा मात्र उभारलाच नाही. यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार ना बोगदा नसल्यामुळे पुंडलिक सुरवाडे, नाना गावंडे, बापू गावंडे, बापू मराठे, माणिक गावंदे या शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले होते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारा विरोधात मंगळवारी तीव्र संताप व्यक्त केला.
इन्फो :
गुरुवारी मातीचा भराव काढण्यात येणार
या शेतकरी बांधवांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने, त्यांना यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती सतावत आहे. याबाबत लोकमत वृत्त मांडल्यानंतर रेल्वेचे उप मुख्य अभियंता पंकज डावरे यांनी शेतातील पाण्याचा निचरा होण्यासाठी तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी उभारण्यात आलेला मातीचा भराव काढण्याची तयारी दर्शविली आहे. हा भराव काढल्यानंतर शेतातील पाणी जुन्या बोगद्यातून सहजपणे बाहेर पडणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतात पाणी तुंबणार नाही. गुरुवारी सकाळी हे काम करण्यात येणार असल्याचे डावरे यांनी सांगितले.