फौजदार भावाची लग्नपत्रिका वाटप करणाऱ्या सैनिकाला कारने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:18 PM2019-01-16T13:18:25+5:302019-01-16T13:18:43+5:30
जळगावातील घटना
: नागरिकांनी फोडली कारची काच
जळगाव : पोलीस उपनिरीक्षक भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटपासाठी जात असलेल्या दीपक मधुकर लोखंडे (वय ३०, रा. शिरसोली, जळगाव) या सैन्य दलाच्या जवानाला भरधाव कारने उडविल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजता काव्यरत्नावली चौकात घडली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दीपकवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
तालुक्यातील शिरसोली दीपक मधुकर लोखंडे यांचे मोठे भाऊ दिनेश मधुकर लोखंडे यांचा १८ जानेवारी रोजी विवाह आहे. ते भिवंडी येथील शांती नगर पोलीस ठाण्यात उपनिरिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी दिनेश लोखंडे हे जलसंपदा विभाग जळगाव येथे लिपिक म्हणून कार्यरत होते.
येथील सर्व परिचितांना लग्न पत्रिका देण्यासाठी दीपक लोखंडे हे त्यांचा भाचा गणेश भारुडे यांच्या दुचाकीने (एम.एच १९ सी.डी. ७५८४) शहरात आले होते.
लग्नपत्रिकांवरुन नागरिकांनी साधला संपर्क
घटनास्थळी सर्व लग्नपत्रिका पडल्याने नागरिकांनी त्यावरील मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधला व अपघाताबाबत माहिती दिली. यादरम्यान एका रिक्षाने चालकाने माणुसकी दाखवित त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. अपघाताची माहिती मिळताच दीपक यांचा भाऊ उपनिरीक्षक दिनेश यांच्यासह नातेवाईकांनी रुग्णालय गाठले. याठिकाणी येथून प्राथमिक उपचारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती दिनेश लोखंडे यांनी दिली.
शेख सादीक शेख हे कुटुंबासह तांबापूर येथे वास्तव्यास आहेत. सेट्रींग काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा मुलगा शाकीप मंगळवारी शिरसोली रोडकडून काव्यरत्नावली चौकाकडे रस्त्याने पायी जात होता. यादरम्यान त्याला आरटीओ कार्यालयासमोर मागून भरधाव कारने धडक दिली. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती कळाल्यानंतर कुटुंबियांनी सिव्हीलमध्ये धाव घेत मुलाच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली. शाकीप हा गतीमंद असल्याचे रुग्णालयात कुटूंबियांनी सांगितले.
गतिमंद बालकालाही मारली धडक
दुचाकीस्वाराला उडविल्याच्या घटनेच्याच वेळी आरटीओ कार्यालयासमोर पायी चालणाºया गतीमंद बालकाला भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली. शेख शाकीप शेख सादीक (१४ रा. तांबापूर) असे जखमी बालकाचे नाव आहे. त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संतप्त नागरिकांनी कारची काच फोडली
शिरसोली नाक्याकडून महाबळ येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात काव्यरत्नावली चौकातून जाण्यासाठी वळण घेत असताना दीपक यांच्या दुचाकीला आकाशवाणीकडून महाबळकडे जाणाºया भरधाव कारने (एम.एच १९ झेड ९९००) जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरुन फेकले गेल्याने जवान दीपक यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर सोबतच्या गणेशला किरकोळ खरचटले. अपघातानंतर कारचालक कार सोडून घटनास्थळाहून पसार झाला होता. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार कार मर्यादेपेक्षा जास्त वेगाने येत होती, दैव बलवत्तर म्हणून अपघातात दीपक बचावला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी कारची काच फोडली. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.