सैनिकांचे गाव फुल गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 09:55 PM2019-08-14T21:55:50+5:302019-08-14T21:58:12+5:30
स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.
सुधीर पाटील
वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : स्वातंत्र्य लढ्यापासून आजतागायत देशाच्या सीमेच्या रक्षणाकरिता लढणारे सैनिकांचे गाव म्हणजे फुलगाव अशी ओळख असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव आहे.
जेमतेम पाच हजार वस्तीच्या या गावात आजी-माजी सैनिकांची संख्या तीनशेवर आहे. स्वातंत्र्य लढ्यात गावातील स्वातंत्र्य सैनिकांनीही सहभाग घेत देशाच्या स्वातंत्र्याकरिता लढण्याचे प्रेरणास्थान सानेगुरुजींकडून मिळाले. तेव्हापासून देशसेवेचे व्रत उचलत आजही देशरक्षणार्थ तरुणांचा कल आहे.
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी गावातील राममंदिरात साने गुरुजीनी इंग्रजाच्या लक्षात न येता देश स्वातंत्र्य लढ्यात तरुणांना सहभागी करून घेत ब्रिटिशांच्या विरोधात फळी उभारली. त्यात त्रंबक झेंडू पाटील, अमृत पाटील (दिवानजी) त्र्यंबक पंडू पाटील, नारायण आवसू चौधरी, भालचंद्र नारायण पाटील, नथ्थू तोताराम चौधरी अशी एक स्वातंत्र्य सैनिकांची फळी उभी राहिली. ब्रिटिश शासनाच्या विरोधात कारवाया करताना त्यांना अमळनेर येथील कारागृहात शिक्षा भोगावी लागली.
त्यानंतर कालांतराने १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतरही देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याकरिता तरूणांचा ओढा असल्याने येथील तरुण गावाच्या लोकसंखेच्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे. सैन्यदलात शिपायापासून हवालदार, नायक, कॅप्टन पदापर्यंत बऱ्याच माजी सैनिकांनी कार्यभार सांभाळला आहे.
कॅप्टन रामदास चौधरी यांनी सन १९६५ मधील पाकिस्तान विरोधात तसेच सन १९७१ बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर वासुदेव सोमा महाजन यांनी सन १९७१ च्या युध्दासह श्रीलंकेत शांती सेनेत सहभाग नोंदवला. तसेच हरी नारायण कोलते यांनी कारगील युध्दात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
माजी सैनिकांचे मार्गदर्शन
सैन्य दलातून निवृत्तीनंतर या माजी सैनिकांनी तरूणांना सतत मार्गदर्शन केल्याने तरूणांचा कल देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात भरती होण्याची वाढल्याने भारतीय सैन्यदलात गावातील तरुणांची संख्याही वाढली.
ऐतिहासीक वास्तू
सन १८११ साली उभारण्यात आलेली राममंदिराची वास्तू १० वर्षांनंतर आजही स्वातंत्र्य लढ्याची साक्षीदार म्हणून डौलाने उभी आहे